संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? पंतप्रधान मोदीविरोधात प्रक्षोभक वक्तव्य; भाजपकडून पोलिसांत तक्रार दाखल
Sanjay Raut on PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : अहमदनगर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना गाडून टाकण्याची प्रक्षोभक भाषा करणाऱ्या उद्धव बाळासाहेब गटाचे (Shiv Sena Uddhav Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध भाजपकडून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 153 अ आणि 506 नुसार कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबईतील मरीन ड्राईव्ह, मरीन लाईन्स तर छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टी विधी प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड. अखिलेश चौबे यांनी दिली आहे.
संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?
दरम्यान, यासंबंधित तक्रार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे आणि नागपूर पोलिसांकडेही करण्यात आली आहे. ॲड. चौबे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 8 मे रोजी अहमदनगर येथे झालेल्या सभेत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू असं वक्तव्य केलं आहे. औरंगजेबाला मराठ्यांनी इथं गाडलं आणि दफन केलं, तसंच तुमच्या बाबतीतही घडेल, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत केलं आहे.
पंतप्रधान मोदीविरोधात प्रक्षोभक वक्तव्य
पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीबाबत खासदार संजय राऊत यांनी वापरलेली भाषा अत्यंत प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण असून यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झालं आहे. औरंगजेबासारख्या परकीय आक्रमकाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असंही ॲड. चौबे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या वक्तव्याबद्दल राऊत यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम 153 अ आणि 506 नुसार कारवाई करावी , असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
भाजपकडून पोलिसांत तक्रार दाखल
अमरावती येथे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहणकर, मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यांच्या वतीने ॲड.मनोज जैस्वाल यांनी, प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात , प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अशाच पद्धतीच्या तक्रारी केल्या आहेत .