Sanjay Raut : बडगुजर कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून दबाव; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : बडगुजर कुटुंबीयांचं नाव घेण्यासाठी आरोपींवर नाशिकचे पोलीस दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
![Sanjay Raut : बडगुजर कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून दबाव; संजय राऊतांचा गंभीर आरोप Sanjay Raut allegation Nashik police putting pressure on accused to implicate Sudhakar Badgujar in false crime Maharashtra Marathi News Sanjay Raut : बडगुजर कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून दबाव; संजय राऊतांचा गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/15/fbf23b7d533744fab7373d9d9c7feab71726376223374923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचे वातावरण पाहता अनेक ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहे. आमचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना व त्यांच्या कुटुंबियांना तीन वर्षांपूर्वीची केस उकरून त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. बडगुजर कुटुंबीयांचं नाव घेण्यासाठी आरोपींवर नाशिकचे पोलीस (Nashik Police) दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेनेचे वातावरण पाहता अनेक ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहे. काल मी नाशिकला होतो. नाशिकला माझ्या लक्षात आलं की, आमचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे निवडणूक लढवत असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी तीन वर्षांपूर्वीची केस उकरून काढली आहे. कोणावर तरी गोळीबार झाला होता असे म्हणतात. त्यातील आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबीयांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणत आहेत.
...तर आम्हाला गंभीर दाखल घ्यावी लागेल
त्यांच्याकडून नाव वदवून घेतल्यावर बडगुजर कुटुंबियांना त्रास द्यायचा आहे हे आमच्या लक्षात आले आहे. काल रात्री मी याविषयी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी शिवसैनिकांना अशा प्रकारे खोट्या प्रकरणांमध्ये अडचणीत आणण्याचे काम सुरू असेल तर आम्हाला त्याबाबत गंभीर दाखल घ्यावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
गडकरींकडे कोणी भूमिका मांडली असेल तर त्यात गैर काय
विरोधी पक्षातील बड्या नेत्याकडून मला पंतप्रधानपदाची (Prime Minister) ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी केला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्य असे नेते आहेत. पंतप्रधान पदासाठी तडजोड करा, असं त्यांना कोणी सांगितलं असेल, असं मला वाटत नाही. मुळात या देशात हुकूमशाही सुरू आहे. एका पद्धतीने आणीबाणी लावण्याचा प्रयत्न दहा वर्षापासून सुरू आहे. त्याच्याशी तडजोड करू नका. त्या प्रवृत्तीची तडजोड करू नका. ही भूमिका त्यांच्याकडे विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने मांडली असेल तर त्यात चुकीचं आहे, असे मला वाटत नाही. आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या देशातल्या मूल्यांशी तडजोड करत आहेत. लोकशाही असेल, स्वातंत्र्य असेल, न्यायपालिका असेल, तो एक राष्ट्रीय अपराध आहे, असे मी मानतो आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने बोलत राहिले आहेत. आपल्या भूमिका मांडत राहिले आहेत. म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा सल्ला त्यांना दिला असेल त्याच्यामध्ये फार पीडा होण्याचं कारण नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)