Sangli Loksabha: सांगलीत विशाल पाटील चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का, नाना पटोलेंनी एका वाक्यात उत्तर दिलं, म्हणाले....
Maharashtra Politics: सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला, विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार? नाना पटोलेंनी सांगितलं वादाचं कारण, संजय राऊतांवर निशाणा. युतीत असे वाद होतात आणि ते न संपणारे असतात
मुंबई: सांगली लोकसभा मतदारसंघ जागावाटपात ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने विशाल पाटील हे नाराज आहेत. त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. मात्र, आम्ही त्यांची समजूत काढू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मविआकडून मतदारसंघनिहाय जागावाटपाचे चित्र स्पष्ट करण्यात आले. यामध्ये सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेली सांगली लोकसभेची (Sangli Loksabha) जागा ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम प्रचंड नाराज झाले आहेत.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगली लोकसभेच्या जागेवरुन सुरु असणाऱ्या राजकीय नाराजीनाट्याबाबत भाष्य केले. यावेळी पटोले यांना, चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विशाल पाटील दिसणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी म्हटले की, विशाल पाटील नाराज आहेत, पण आम्ही त्यांची समजूत काढू. भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी घडी विस्कटून टाकली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच नव्हे तर महायुतीमध्येही जागावाटपावरुन वाद पाहायला मिळत आहेत. युतीच्या राजकारणात काही गोष्टी सहन कराव्या लागतात. युतीत असे वाद होतात आणि ते न संपणारे असतात, असे नाना पटोले यांनी सांगितले.
महाराष्ट्रात यंदा वेगळं वातावरण आहे. त्यामुळे जागावाटपात काही कार्यकर्त्यांना अन्याय झाल्यासारखं वाटेल. ते स्वाभाविक आहे. ते नाकारता येत नाही. या सगळ्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचे भान आम्हाला आहे. आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करु, असे नाना पटोले यांनी म्हटले.
विशाल पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
काँग्रेस नेतृत्त्वाने सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटासाठी सोडल्याने आता विशाल पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मविआच्या पत्रकार परिषदेनंतर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम अद्याप प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. आज संध्याकाळी विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्याकडून पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली जाईल. मात्र, सांगलीत सध्या विशाल पाटील समर्थकांकडून, 'आमचं चुकलं काय? आता लढायचं' असा मथळा असलेल्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्यामुळे आता विशाल पाटील सांगलीतून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा