बाळासाहेबांनी सुरु केलेली सामना नावाची चळवळ संपलीय, संजय राऊतांची वळवळ राहिलीय : संदीप देशपांडे
Sandeep Deshpande on Sanjay Raut : एकीकडे आंदोलनाला पाठिंबा द्यायचा तर दुसरीकडे बंदराला साथ द्या अशा जाहिराती घ्यायच्या. बाळासाहेबांनी सुरु केलेली सामना नावाची चळवळ संपलेली आहे, आता फक्त संजय राऊतांची वळवळ राहिलेली आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.
Sandeep Deshpande on Sanjay Raut : 'सामना' वृत्तपत्रातील पालघरमधील वाढवण बंदराच्या जाहिरातीवरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. वाढवण बंदराच्या (Vadhavan Port) मुद्द्यावर सामनामधून दुटप्पी भूमिका घेतली जाते. एकीकडे आंदोलनाला पाठिंबा द्यायचा तर दुसरीकडे बंदराला साथ द्या अशा जाहिराती घ्यायच्या. सन्माननीय बाळासाहेबांनी सुरु केलेली सामना नावाची चळवळ संपलेली आहे, आता फक्त संजय राऊतांची वळवळ राहिलेली आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.
एकीकडे आंदोलनाला पाठिंबा, दुसरीकडे बंदराला पाठिंबा देणारी जाहिरात
18 नोव्हेंबर रोजी दैनिक सामनामध्ये बंदराला साथ द्या, प्रगतीला वाट द्या, अशाप्रकारची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. याच जाहिरातीवर मनसेने बोट ठेवलं आहे. याबाबत संदीप देशपांडे म्हणाले की, "वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा, त्याचेवळी सामनामध्ये बंदराच्या समर्थनार्थ जाहिरात द्यायची. मला वाटते या प्रकारची दुटप्पी भूमिका सामनामध्ये अनेकदा घेतली जाते. एकीकडे लोकांच्या आंदोलनाला पाठिंबा दुसरीकडे बंदरालाही पाठिंबा द्यायचा. म्हणजे तुमची नेमकी भूमिका काय. सन्माननीय बाळासाहेबांनी सुरु केलेली सामना नावाची चळवळ संपलेली आहे, आता फक्त संजय राऊतांची वळवळ राहिलेली आहे.
'दुटप्पी सामना', संदीप देशपांडे यांचं ट्वीट
दरम्यान या जाहिरातीवरुन शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करुन संदीप देशपांडे यांनी ट्वीट देखील केलं आहे.
दुटप्पी सामना! pic.twitter.com/NxGDGVma7o
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 22, 2022
'सामनाचं आता फक्त पैसे देवो भव: राहिलंय'
"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजयी करा, अशी जाहिरात सामना घेणार आहे का? हे त्यांच्या भूमिकेच्या विरोधात आहे. एकीकडे तुम्ही आंदोलनाला पाठिंबा देत असाल तर त्या कंपनीची जाहिरात का घेता? म्हणजे लोक मातृ देवो भव: म्हणतात, पितृ देवो भव: म्हणतात तसं सामनाचं आता फक्त पैसे देवो भव: एवढंच राहिलेलं आहे," अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदराला ठाकरे गटाचा पाठिंबा
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. यासाठी स्थानिकांकडून वाढवण बंदराविरोधात केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात सोमवारी (21 नोव्हेंबर) आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर जमले होते. प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत हे देखील या आंदेलनात सामील झाले होते. शिवसेना ठाकरे गट मोर्चेकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन सावंत यांनी दिलं. वाढवण बंदर रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं त्यांनी ठासून सांगितलं.