जन्मजयराजे भोसलेंनी माझा विश्वासघात केला; वंगणफेक हल्ल्यानंतर पहिल्यांदाच बोलले प्रवीण गायकवाड
अक्कलकोटमध्ये जन्मजेय राजे भोसले यांनी ज्याप्रकारे हा विषय हाताळायला पाहिजे होता तसा हाताळला नाही. माझ्यावर अचानक हल्ला झालाच नाही, हल्ला झाला अशावेळेस कार्यक्रम पूर्णपणे चालू राहिला.

पुणे : महाराष्ट्रात जी सामाजिक परिस्थिती उद्भवली आहे ती महाभयंकर आहे, समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे, माझ्यावर टाकण्यात आलेली ती शाई नसून वंगण तेल आहे. अक्कलकोटमध्ये (Akkalkot) माझ्या हत्येचा कट होता, मुख्यमंत्र्यांकडे गृहखातेही आहे, सगळी मुख्यमंत्र्यांची आहे, असे प्रवीण गायकवाड (Pravin gaikwad) यांनी म्हटलं. दीपक काटे याच्यावर गुन्हे दाखल आहेत, काटेच्या पाठिशी मुख्यमंत्री आहेत. आता, त्यांनी आत्मघातकी कृत्य केलं आहे. काटेवर 10 गुन्हे दाखल आहेत, तो युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. भाजप सदस्य आहे, मात्र त्यांचा हा विचार नाही मग हा कुठला सदस्य आहे? असा सवाल उपस्थित करत प्रवीण गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केलं. तर, जन्मजेयराजे भोसलेंनी माझा विश्वास घात केल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.
अक्कलकोटमध्ये जन्मजेय राजे भोसले यांनी ज्याप्रकारे हा विषय हाताळायला पाहिजे होता तसा हाताळला नाही. माझ्यावर अचानक हल्ला झालाच नाही, हल्ला झाला अशावेळेस कार्यक्रम पूर्णपणे चालू राहिला, दोन अडीच तास कार्यक्रम झाला, कोणी माणूस उठला नाही. भोसले यांनी घडलेल्या घटनेबाबत आजपर्यंत कुठलीही तक्रार नोंदवली नाही, जर आयोजकांचा कार्यक्रम होता, मला तिथं बोलवून अशा प्रकारे हत्या करणे, अपमान करणे, यामध्ये ते सामील आहेत की नाहीत हे तपासले पाहिजे? असे वक्तव्य प्रवीण गायकवाड यांनी केलं आहे.
आयोजक म्हणून भोसलेंनी जबाबदारी पार पाडली नाही
भोसले यांनी साधा निषेध सुद्धा कार्यक्रमात नोंदवला का नाही हे पण माहित नाही. एक महिना या कार्यक्रमाचा पाठपुरावा जन्मजेय भोसले करत होते, आपण बोलावलेला पाहुणा तोही सत्कारासाठी, ज्याचा अशा प्रकारे अपमान झाला आहे. याची काळजी कोणी घ्यायची? असाही सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. सोलापूरमध्ये सध्या दोन गट निर्माण झाले आहेत. आयोजक म्हणून भोसले यांनी जबाबदारी पार पाडली नाही. आयोजकांकडून आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, सोलापूरमध्ये गुन्हेगाराला अटक व्हावी म्हणून माझ्या कार्येकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जन्मजेय भोसले यांच्याबद्दल आदर आहे, त्यांनी बोलावले म्हणून मी कार्यक्रमासाठी गेलो. पण, त्यांनी जे कर्तव्य पार पाडायचे होते, ते पाडले नाही, असेही गायकवाड यांनी जन्मजेय भोसलेंबाबत म्हटले.
प्रवीण गायकवाडांची आरएसएसवर टीका
सोशल मीडियावर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ फिरत आहे, बावनकुळे सांगतात की, दीपक काटे गुन्हेगार नाही, त्याच्यावर मागच्या सरकारने गुन्हे दाखल केले होते. बावनकुळे आणि काटे यांचे काही हजार फोटो आहेत. काटे याच्या शाखांचे उद्घाटन बावनकुळेंनी केले आहे. संघाच्या नागपूरच्या शाखेत ठरलेलं आहे की, सामाजिक चळवळीमधील बामसेफ, संभाजी ब्रिगेड, वंचित आघाडी यांना थोपविले पाहिजे, थांबवले पाहिजे, अशी माहिती माझ्याकडे आहे. हिंसेची समर्थक विचारसरणी उजवी आहे, अनेक खून झाले आहेत. अशा गुन्हेगार लोकांना राजकीय प्रतिष्ठा द्यायची आणि आमच्यासारख्यांवर हल्ले करायचे. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या आहेत, त्यांचे लोकं अजून सापडले नाहीत, जे लोक सापडतात ते असेच असतात, असे म्हणत प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली.
हेही वाचा
दीपक काटेच्या कानात अमोलराजे भोसले काय बोलले? राड्यानंतर व्हायरल व्हिडिओवर जन्मजेयराजेंचं स्पष्टीकरण




















