Kiran Samant: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी हालचालींना वेग, किरण सामंत थेट नागपूरात; अंतिम कौल देवेंद्र फडणवीस देणार
Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा कोण लढवणार, फडणवीस अंतिम निर्णय घेणार; किरण सामंत नागपूरमध्ये दाखल. पेपरमध्ये 100 पैकी 100 मार्क पाडेन, किरण सामंतांना विजयाचा विश्वास
नागपूर: शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात सुटण्याची शक्यता आहे. उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शनिवारी झालेल्या भेटीनंतर त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गातून (Ratnagiri Sindhudurg Loksabha) लढण्यासाठी इच्छूक असलेले शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत (Kiran Samant) यांना भेटीसाठी नागपूरमध्ये बोलावून घेतले आहे. किरण सामंत यांनी फडणवीसांची भेट घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी किरण सामंत यांनी आपल्याला रत्नागिरी-सिंधुदुर्गात विजयाची 100 टक्के खात्री असल्याचे सांगितले.
किरण सामंत यांनी म्हटले की, काल उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी मला आज भेटायला बोलावले आहे. माझे पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल. मी रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्यासाठी 100 टक्के आग्रही आहे. मला ही उमेदवारी मिळावी, ही विनंती करायला मी देवेंद्र फडणवीसांकडे आलो आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात कमळापेक्षा धनुष्यबाण अधिक चालेल: किरण सामंत
सध्या देशभरात कमळाचा जोर आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला कमळाच्या चिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत. परंतु कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तिकडे धनुष्यबाण आवश्यक आहे. माझी निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मला फक्त पेपर सोडवायचा आहे आणि 100 पैकी 100 मार्क मिळवायचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल. 1999 पासून मी उद सोबत राजकारणात आहे. आज मी 52 वर्षांचा आहे, मलाही आता राजकारणात यावसं वाटत आहे. त्यामुळे मी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही आहे, असे किरण सामंत यांनी सांगितले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे नारायण राणे 19 तारखेला उमेदवारी अर्ज भरु शकतात, अशा चर्चा आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता किरण सामंतांच्या बाजूने कौल देणार की त्यांची समजूत काढणार, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा