Ratnagiri News: राणेंना समर्थन की विरोध; रत्नगिरीत शिवसेनेचा पुन्हा स्टेटस गेम, 'मन की बात'मुळे राजकीय चर्चांना उधाण
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील शिवसेनेचे (Shiv Sena) महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सोशल मीडियावर मन की बात अशा आशयाचे स्टेटस झळकू लागले आहेत.
रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election) मतदारसंघातील निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपली असताना शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील स्टेटस गेम सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आठ दिवसापूर्वी महायुतीच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो नसल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांचा प्रचार थांबवला होता. दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्यानंतर शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात आली होती. या गोष्टीला काही दिवस पूर्ण होत असताना आता नवा विषय चर्चेला आला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील शिवसेनेचे (Shiv Sena) महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सोशल मीडियावर मन की बात अशा आशयाचे स्टेटस झळकू लागले आहेत. या स्टेटसमुळे राजकीय नेत्यांसह मतदार सुद्धा संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे.
मन की बातच्या नव्या स्टेटस गेममुळे आधीची इच्छुक उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांचे कार्यकर्ते अजूनही नाराज आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे मन की बात नेमकी कोणासाठी असा सवाल मतदारांमधून विचारला जातोय. खरंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत (Kiran Samant) यांचे तिकीट जवळपास निश्चित झाल्याचे अंतिम क्षणापर्यंत बोलले जात होते. मात्र राजकीय धुरंदर आणि अनेक वर्षांचा राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनी दिल्लीतून ऐनवेळी सूत्र हलवली.
मतदारांची नेमकी मन की बात कोणती?
किरण सामंत यांच्या पदरात पडणारे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची लोकसभेची तिकीट पहिल्यांदाच भाजपच्या पारड्यात पाडून घेतली. कदाचित यामुळेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरातील शिवसैनिक आणि किरण सामंत यांचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या देखील चर्चा उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुरू आहेत. त्यामुळे किरण सामंत यांनी जरी मी नाराज नाही असे म्हटले असले किंवा उदय सामंत यांच्याकडून नारायण राणे यांना लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवून देऊ असा दावा केला जात आहे. तरी इथल्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार यांची मन की बात नेमकी कोणती आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागच्या आठवड्यात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेने रत्नागिरी शहरात जाहीर मेळावा घेतला होता. याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाही मेळावा पार पडला या दोन्ही कडील लोकांची उपस्थिती खूप काही सांगणारे होती.
कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला
कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अगदी नारायण राणे असो किंवा उदय सामंत, या दोघांच्याही राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून अगदी जोरदारपणे झाली त्यामुळे कोकणामध्ये शिवसेनेचे पाळेमुळे खोलवर असल्याचे बोलले जाते. मात्र राजकीय स्थित्यंतरामुळे झालेले राजकीय बदल कोकणातील जनतेला कितपत मान्य आहेत हे आता पुढील काळात पहावे लागेल. या सगळ्या राजकीय घडामोडीत नेतेमंडळीतील संवाद आणि कार्यकर्ते यांच्यातील प्रत्यक्ष कृती कोणाला पोषक ठरते आणि कोणाला मारत ठरते हे पाहणं देखील तितकेच महत्वाचे आहे.
हे ही वाचा :