(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'वाघ एकला राजा बाकी खेळ...; राजन साळवींच्या एसीबी तपासणीनंतर रत्नागिरी शहरात बॅनर वॉर
Rajan Salvi Ratnagiri : शहरातील अनेक ठिकाणी राजन साळवी यांचे बॅनर लावण्यात आले असून, त्यावर राजन साळवी यांच्या विरोधकांवर निशाणा साधत 'वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा' असे लिहण्यात आले आहे.
Rajan Salvi Ratnagiri : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्या निवासस्थानी गुरुवारी दिवसभर तब्बल 10 तास एसीबीकडून (ACB Enquiry) झाडाझडती घेण्यात आली. मात्र, याच कारवाईनंतर आता रत्नागिरी शहरात बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक ठिकाणी राजन साळवी यांचे बॅनर लावण्यात आले असून, त्यावर राजन साळवी यांच्या विरोधकांवर निशाणा साधत 'वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा' असे लिहण्यात आले आहे.
राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या (Ratnagiri) निवासस्थानी एसीबीकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी हे चौकशीसाठी अलिबाग (Alibag) येथील एसीबीच्या कार्यालयात हजर राहिले आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या कारवाईनंतर साळवी यांचे कार्यकर्ते आक्रमक होतांना पाहायला मिळत असून, शहरातील अनेक भागात बॅनर लावून विरोधकांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. 'कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष' असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आला आहे.
राजकीय विरोधकांना इशारा देण्याचा प्रयत्न...
आपल्यावर करण्यात येत असलेली कारवाई राजकीय द्वेषातून करण्यात येत असून, आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याने अशी कारवाई होत असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला होता. त्यानंतर काल झालेल्या एसबीच्या पथकाच्या चौकशीनंतर राजकीय विरोधकांना इशारा देण्याचा प्रयत्न राजन साळवींच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. यासाठीच आज शहरातील अनेक भागात बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळपासून या बॅनरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
पुन्हा एसीबीची नोटीस...
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी गुरुवारी एसीबीच्या पथकाने कारवाई करत तब्बल 10 तास झाडाझडती घेतली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तर, आता राजन साळवी यांना एसीबीकडून पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली आहे. सोमवारी रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, थोरले बंधू यांच्यासह दुपारी बारा वाजता हजर राहावे असेही नोटीसमध्ये उल्लेख पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 6 वेळा चौकशीसाठी अलिबाग (Alibag) येथील एसीबीच्या कार्यालयात हजर राहिले आहेत.
आमची अटक होण्याची तयारी...
एसिबीची नोटीस आल्यानंतर राजन साळवी यांनी तातडीने पत्रकार परिषेद बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "सोमवारी रत्नागिरीच्या एसीबीच्या कार्यालयात हजर राहणार आहे. यावेळी मी आणि माझा भाऊ दोघेही हजर राहणार आहोत. आतापर्यंत माझ्याशी संबंधित 70 जणांना नोटीस आल्या आहेत. यापूर्वी माझा भाऊ, मुलगा, वाहिनी यांची चौकशी झाली आहे. कुटुंबाला त्रास देण्याचा उद्देश आहे. माझ्यासह माझ्या भावावर आणि पुतण्यावर कर्ज आहेत. माझ्याकडे साडेतीन कोटी रुपये बेहिशबी मालमत्ता असल्याच म्हणणाऱ्या एसीबीला न्यायालयात उत्तर द्यावे लागेल. ज्या कंत्राटदारानी सरकारची कामे केली त्यांना देखील आमदारांना काही पैसे दिले का? असा सवाल एसीबीने विचारला आहे. अटक झाली तरी त्याला सामोरे जायची मुलगा, पत्नी आणि माझी तयारी असल्याचे," साळवी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :