पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, आता शिंदेंच्या शिवसेनेत कोकणातील तीन दिग्गज नेते आहेत.
रत्नागिरी: राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha) घोषणाही पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. आपल्या मर्जीतील आणि जवळच्या उमेदवाराला संधी देऊन विधानसभेत पाठवण्याचा प्रयत्न पक्षप्रमुखांकडून होत आहे. त्यातच, मतदारसंघात वजनदार असलेल्या उमेदवारांकडून संधी मिळाली तर ठीक, नाहीतर बंडखोरी ठरलेली असा पवित्रा जपला जात आहे. त्यातच, नातेवाईकांना देखील निवडणुकीत उतरवण्याचा फंडा नेतेमंडळींकडून सुरू असतो. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या उमेदवारीला आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas kadam) यांनी विरोध केला आहे.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, आता शिंदेंच्या शिवसेनेत कोकणातील तीन दिग्गज नेते आहेत. मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर हे कोकणातून येतात. तर, रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे, येथील विधानसभेच्या उमेदवारी देताना निश्चितच या नेत्यांना विचारात घेतले जाईल. मात्र, एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदु झाला आहे. कारण, गुहागरमधून खासेदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांनी उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी रविवारी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. मात्र, या उमेदवारीला रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दात विरोध केला आहे.
विपुलच्या उमेदवारीला विरोध, पराभव नक्की
जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटतं नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, अशा शब्दात रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर, त्याचा पराभव नक्की असल्याचंही कदम यांनी स्पष्टच सांगितलं. तसेच, विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा, पण मी गुहागर विधानसभा मतदार संघात पाय ठेवणार नाही, असेही रामदास कदम यांनी परखडपणे बोलून दाखवले.
दरम्यान, शिंदे गटाकडून पितृपक्ष संपल्यानंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बातमी बाहेर येताच विपुल कदम हे कामाला लागल्याचे दिसत आहे. कारण, विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये 'धर्मवीर-2' या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विपुल कदम यांच्याकडून शहरात याचे फलक लावून जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. यानिमित्ताने विपुल कदम हे गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.
विधानसभेला विपुल कदम Vs भास्कर जाधवांचा सामना
ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने विपुल कदम यांना रिंगणात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत त्यांना भास्कर जाधव यांच्याशी दोन हात करावे लागतील. विपुल कदम यांच्या पाठीशी श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण ताकद उभी राहणार असली तरी भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचा सामना करताना विपुल कदम यांचा कस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विपुल कदम हे भास्कर जाधव यांचा सामना कसा करणार, हे पाहणे आगामी काळात औत्स्युकाचे ठरेल. मात्र, या मतदारसंघातून भाजपचे विनय नातू आणि निलेश राणे हे दोघेही इच्छूक आहेत. त्यामुळे आता गुहागरची जागा आपल्या मेहुण्यासाठी पदरात पाडून घेताना श्रीकांत शिंदे भाजपची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.