Rajya Sabha Election 2024: पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा; रोहित पवारांचा अजितदादांना सल्ला
Maharashtra Politics: पार्थ पवार, सुनेत्रा पवार की छगन भुजबळ, अजितदादांचा कोणता शिलेदार राज्यसभेवर जाणार? अर्ज भरण्यासठी अवघे काही तास शिल्लक. राज्यसभेसाठी उमेदवारी भरण्यासाठी गुरुवार हा शेवटचा दिवस आहे.

मुंबई: राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. अजितदादा गटाच्या प्रफुल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला होता आणि ते नव्याने निवडून आले होते. त्यामुळे प्रफुल पटेल यांची पूर्वीच राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. देशातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवेळी (Rajya Sabha Election 2024) ही जागादेखील भरली जाईल. मात्र, या जागेवरुन कोणाला रिंगणात उतरवायचे, याबाबत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अद्याप एकमत झाले नसल्याचे चित्र दिसत आहे. आज राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजता ही मुदत संपेल. मात्र, अजित पवार गटाने (Ajit Pawar camp) अद्यापही आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. यासाठी अजित पवार गटात राज्यसभेवर जाण्यासाठी असलेली स्पर्धा कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी अजितदादांना एक सल्ला दिला आहे.
राज्यसभेच्या या जागेसाठी अजितदादा गटातील जवळपास 10 ते 12 नेते इच्छूक होते. मात्र, पक्षांतर्गत छाननी झाल्यानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांची नावे आघाडीवर आहेत. अजित पवार हे लोकसभेची संधी हुकलेल्या छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र, रोहित पवार यांनी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्विट करुन अजित पवार यांना एक सावधानतेचा सल्ला दिला आहे. राज्यसभेची उमेदवारी घरच्याच व्यक्तीला द्या, पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही अशी चर्चा सुरु आहे. म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना Advance मध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!!!, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि 'पळत्या' या उपाधीचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2024
अजित पवारांकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासाठी जाणीवपूर्वक उशीर?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या या जागेवरुन उमेदवारी मिळण्यासाठी सध्या पार्थ पवार (Parth Pawar), बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे इच्छूक आहेत. या सगळ्यांमध्ये सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर असले तरी त्यामुळे इतर उमेदवार नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांनी कोणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित केले असले तरी त्याचे नाव जाहीर करण्यात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधी हे नाव जाहीर केले जाईल. जेणेकरुन उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांचे नाराजीनाट्य फार काळ रंगणार नाही, याची तजवीज अजित पवार यांनी केल्याचे बोलले जाते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
