Raj Thackeray Uddhav Thackeray: फक्त दोन खुर्च्या, मागे महाराष्ट्राचा नकाशा अन्... ठाकरे बंधूंच्या एन्ट्रीला बड्या इव्हेंट कंपन्या फेल ठरतील असा ग्रँड शो
Raj Thackeray & Uddhav Thackeray Rally: विजयी मेळाव्याच्या मराठी व्यासपीठावर फक्त ठाकरे बंधू असणार, भव्य ग्रँड एन्ट्री सुद्धा होणार. विजयी मेळाव्यात नक्की काय घडणार?

Raj Thackeray Uddhav Thackeray Rally in Mumbai: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे शनिवारी विजयी मेळाव्याच्यानिमित्ताने 20 वर्षांनी एकत्र येणार आहेत. या विजयी मेळाव्याकडे ठाकरे बंधूंचे (Thackeray Brothers) राजकीय मनोमीलन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने या मेळाव्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांसोबत मराठी मतदारांच्या मनातही ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही सुप्त इच्छा होती. ही इच्छा आज प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे नियोजनही तसेच भव्यदिव्य करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वरळी डोममध्ये होऊ घातलेल्या या सोहळ्यात फक्त चार जणांची भाषणं होणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या प्रकाश रेड्डी यांचा समावेश आहे. व्यासपीठावर फक्त दोन खुर्च्या असतील. त्या अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी असतील. ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र येण्याचा क्षण हा अत्यंत विशेष आणि लक्षात राहणारा असेल. प्राथमिक माहितीनुसार, वरळी डोमच्या व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो दोन वेगवेगळ्या मार्गांनी एकाचवेळी प्रवेश करतील. राज-उद्धव व्यासपीठावर येताच एकमेकांकडे पाहतील आणि स्टेजच्या मध्यभागी येऊन मराठी जनतेला अभिवादन करतील. या व्यासपीठावर मोजकीच सजावट करण्यात आली आहे. स्टेजवर दोन खुर्च्या, फुलांची सजावट आणि बॅकड्रॉपला महाराष्ट्राच नकाशा असेल. राज आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र असे ठसवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र आले आहेत, हा संदेश जास्तीत जास्त प्रभावीपणे मराठी मतदारांपर्यंत कसा पोहोचेल, यासाठी मनसे अन् ठाकरे गटाने नियोजन केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची देहबोली आणि प्रत्येक कृतीकडे आज सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
थोड्याचवेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपापल्या घरातून वरळीच्या दिशेने निघतील. या सोहळ्यासाठी अनेक मराठी सेलिब्रिटी, पाहुणे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने वरळीत पोहोचले आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
आणखी वाचा
राज ठाकरे म्हणाले, पक्षाचा झेंडा, चिन्ह काहीही नको; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष























