Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: राज ठाकरे म्हणाले, पक्षाचा झेंडा, चिन्ह काहीही नको; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: आजच्या विजयी मेळाव्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह नको, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally मुंबई: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्याचा दारूगोळा या ठाकरी तोफेत भरला गेला आणि सरकारला टोकाचा विरोध झाला. ठाकरे बंधूंनी एकत्र आंदोलनाची हाकही दिली होती. अखेर सरकारला जीआर मागेही घ्यावा लागला. त्यानंतर आता ठाकरे बंधू विजयी मेळावा घेत आहेत. या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधूंची सरकारवर तोफ धडाडणार हे निश्चित आहे.
आजच्या विजयी मेळाव्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह नको, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. या मेळाव्याला कोणताही झेंडा नको, फक्त मराठीचा अजेंडा असू द्या, असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. याचपार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज घातलेल्या टी-शर्टने लक्ष वेधलं आहे. संदीप देशपांडे यांनी आवाज मराठीचा लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलेलं आहे. तसेच टी-शर्टवर बाराखडी लिहिलेलं आहे. यावेळी महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकावीच लागेल, अन्यथा त्यांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला आहे.
आवाज मराठीचा ! pic.twitter.com/cPk2fYInxc
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 5, 2025
विजयी मेळाव्याच्या केंद्रस्थानी राज आणि उद्धव ठाकरे-
महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी सक्तीची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. मात्र, या निर्णयाला जोरदार विरोध झाल्याने राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचे दोन जीआर रद्द केले होते. हेच जीआर रद्द करण्यासाठी ठाकरे बंधूंनी 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. परंतु, जीआर रद्द झाल्याने या मोर्चाचे प्रयोजन संपले होते. तरीही एकत्र येण्याची ओढ लागलेल्या ठाकरे बंधूंनी मोर्चा नाही तर मग विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले होते. या विजयी मेळाव्याला महाविकास आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित राहणार आहेत. परंतु, गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता मविआतील पक्षांकडूनही या विजयी मेळाव्याच्या केंद्रस्थानी राज आणि उद्धव ठाकरेच राहतील, असे निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
























