Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: 'सामना'च्या मुखपृष्ठावर मोठ्या कालावधीनंतर राज अन् उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो; नेमकं काय म्हटलंय?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: आजच्या 'सामना'च्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार, अशी चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अनेक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया, सूचक वक्तव्यही येतायत. पण या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल मनसे नेते संदीप देशपांडेंनी, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावं असं म्हंटलं आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंसोबत युतीवर मोठं वक्तव्य केलं. जे जनतेच्या मनात ते होईल असं म्हणत, आता थेट बातमीच देऊ असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्यानंतर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यात मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो पाहायला मिळाला.
आजच्या 'सामना'च्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला आहे. मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोसह उद्धव ठाकरे म्हणाले, संदेश देणार नाही...बातमीच देतो...महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, शिवसेना-मनसे युतीबाबत थेटच बोलले...सूर जुळणार! उत्सुकता वाढली, असंही म्हटलं आहे. 
मनसेमध्ये सध्या बैठकांचं सत्र-
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे मुंबईत जोरदार वारे वाहात आहेत. त्यातच मनसेमध्ये सध्या बैठकांचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज महत्त्वाची मनसे उपाध्यक्षांची बैठक होत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना या बैठकीला महत्त्व आहे. बैठकीत राज ठाकरे कोणता मंत्र पदाधिकारी, उपाध्यक्ष यांना देणार याची उत्सुकता आहे. मनसे - ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसंदर्भात कोणतंही भाष्य करु नका, अशा सूचना राज ठाकरेंनी, पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान युतीबाबत कोणताही औपचारिक प्रस्ताव आला नसल्याची माहिती देताना, मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोलाही लगावला.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असंही ते म्हणाले. युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेलं पुढचं पाऊल असल्याची चर्चा आहे.























