Raj Thackeray: मोर्चापूर्वी राज ठाकरेंना पहिलं यश, आदित्य ठाकरेंच्या वरळीतील शाळेचा पाठिंबा, हिंदीविरोधात शिक्षकही भरभरून बोलले!
Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरे यांनी हिंदीसक्ती विरोधात घेतलेल्या भूमिकेला आता शाळांकडून देखील पाठिंबा मिळत आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार आहेत. हिंदी सक्ती विरोधात 5 जुलैला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकत्र मोर्चा काढणार आहेत. संपूर्ण राज्याला ठाकरे बंधू एकत्र कधी येणार याची उत्सुकता होती. गेल्या 20 वर्षात ठाकरे बंधू एकत्र येऊन राजकीय आंदोलन करण्याचा हा पहिलाच प्रसंग असणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ठाकरे बंधू एकत्र येत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. 5 जुलैला सकाळी 10 वाजता मोर्चा काढण्याचं नियोजन आहे. मोर्चाचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. पण या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत मराठीसाठी एल्गार करणार आहेत. आता राज ठाकरे यांनी हिंदीसक्ती विरोधात घेतलेल्या भूमिकेला आता शाळांकडून देखील पाठिंबा मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील शाळेने राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मोर्चात सर्वपक्षीयांसह सर्व साहित्यिक, कलाकार, तज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील सहभागी व्हावं, असं आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलं होतं.
वरळीतील शाळेचा राज ठाकरेंना पाठिंबा-
वरळी येथील लिटिल स्टार स्कूलने आज आम्हाला पाठिंबा देत कोणत्याही परिस्थितीत हिंदीसक्ती नको, असं म्हटलं आहे, अशी माहिती मनसेचे नेते संतोष धुरी यांनी दिली. तसेच सरकारने शाळांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे हे लक्षात ठेवावं, असा इशारा संतोष धुरी यांनी दिला आहे.
शाळेतील शिक्षक काय म्हणाले?
6 वर्षाच्या मुलाला हिंदी भाषा शिकताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे हिंदी सक्ती नको, शाळेतील शिक्षकांचं म्हणणं आहे. राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, म्हणून आमच्या शाळेने पाठिंबा दिला आहे. आमच्या शाळेत केजी पासूनचे वर्ग आहेत आम्हाला अंदाज आहे की, मुलांना शिकताना किती अडचणी येतात. त्यातच त्यांना आणखी एका भाषेची सक्ती अडचणीची ठरू शकेल, असं लिटिल स्टार स्कूलमधील शिक्षकांनी सांगितलं.



















