(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंची अजितदादांवर स्तुतीसुमनं
Raj Thackeray Pune Speech : जर काँग्रेससाठी मशिदीतून फतवे काढले जात असतील तर हिंदूंनीही एकत्र येऊन भाजपच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.
पुणे : कुणीतरी उठतोय आणि जातीचं राजकारण करतोय, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बरबाद झाल्याचं सांगत 1999 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीयतेचं विष पेरलं गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला. शरद पवारांसोबत राहूनही अजित पवार (Ajit Pawar) या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही असंही ते म्हणाले. जर काँग्रेससाठी मशिदीतून फतवे निघत असतील तर राज ठाकरे आज फतवा काढतोय की भारतीय जनता पक्षाला मतदान करा, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे जातीयतेचं राजकारण
राज ठाकरेंनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना केली आणि राज्यात जातीयतेचं राजकारण सुरू झालं. राम गणेश गडकरींच्या पुतळ्यावरून राजकारण झालं. भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण झालं. पण राष्ट्रवादीतील अजित पवार या माणसाने कधीही जातीचं राजकारण केलं नाही. शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी जातीचं राजकारण केलं नाही.
हिंदूंसाठी जाहीर आवाहन
राज ठाकरे म्हणाले की, काँग्रेससाठी जर मशिदीतून फतवे निघत असतील, मतदान करा म्हणून मशिदींमधले मौलवी फतवे काढत असतील, तर आज हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगतो, मुलीधर मोहोळ आणि शिंदे-अजित पवारांच्या उमेदवारांना मतदान करा.
ही निवडणूक मुद्दे नसलेली
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात त्यांनी 1971 पासून ते आतापर्यंतच्या निवडणुकीतील विषयांचा इतिहास सांगितला. ते म्हणाले की, ही पहिली निवडणूक पाहतोय ज्याला काहीही विषय नाही, कोणताही अजेंडा नाही. त्यामुळेच प्रत्येकजण शिव्या देत सुटलाय. महाराष्ट्र असा कधी नव्हता. महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी लोकांना वेगळ्याच विषयांमध्ये गुंतवून ठेवलंय.
अनेक लोक आता देश सोडून जात आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या सभोवतालचं वातावरण. जे काही राजकीय मुद्दे असतात ते खालपर्यंत जातात आणि वातावरण गढूळ बनतं. त्यामुळे आमदार-खासदारांची जबाबदारी आहे की त्यांनी सभोवतालचं वातावरण चांगलं ठेवणं असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबई शहर बरबाद व्हायला एक काळ गेला, पण पुण्याची वाट लागायला वेळ नाही लागणार. जर नियोजन नसेल तर शहर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरे म्हणाले की, "प्रत्येक शहराची एक मानसिकता आहे. मुंबईत लोकलने प्रवास हा वर्षानुवर्षे सुरू आहे. पुण्यामध्ये कुठे जायचं असेल तर लगेच गाडी काढली जाते. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या दहा वर्षांमध्ये 30 लाख लोक बाहेरून आली. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उद्योगांसाठी आलं आहे. आज पुण्यात 70 लाख लोकसंख्या आहे, पण शहरातील वाहनांची संख्या ही 72 लाख आहे."
ही बातमी वाचा: