Raj Thackeray : राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थवर बोलावलं, महायुतीतील एंट्रीपूर्वी महत्त्वाची बैठक
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरु आहेत. महायुतीबाबत मोठा निर्णय घेण्यापूर्वी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झालेल्या असून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी 5 टप्प्यात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातून अधिक जागा जिंकण्यासाठी महायुतीचे (Mahayuti) प्रयत्न सुरु आहेत. महायुतीमध्ये मनसेला (MNS) घेण्यासंदर्भात दिल्ली ते मुंबई बैठकांचं सत्र सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील बैठकांचं सत्र संपल्यानंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बैठकांचं सत्र सुरु आहे. मुंबईतील वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस एँड येथे राज ठाकरे (Raj Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे विविध लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरु असलेल्या बैठकीनंतर राज ठाकरे काही लोकसभा मतदारंसघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याच माहिती आहे. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना बोलावणं पाठवलं असून मनसेचे पदाधिकारी मुंबईत दाखल होत आहेत. नाशिकच्या अनेक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी बोलावून घेतलं आहे.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये संघटनात्मक बांधणी चांगली आहे. नुकताच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा पार पडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या लोकसभेची जागा मनसे लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी नाशिकसह अनेक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी मुंबईला बोलावले आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.
नाशिकची जागा मनसेला मिळावी
राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणं नाशिकचे मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. राज ठाकरे त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांकडून लोकसभेच्या जागांबाबत आढावा घेणार आहेत. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडून नाशिकची जागा मनसेला मिळावी मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे.
महायुतीत मनसेला कोणती जागा मिळणार?
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीत मनसेला दोन जागा मिळण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, महायुतीत मनसेला एक जागा मिळू शकते अशी चर्चा आहे. मनसेला दक्षिण मुंबई, शिर्डी जागा मिळतील अशा चर्चा होत्या. आता नाशिकचे पदाधिकारी देखील दावा सांगणार असल्यानं मनसेला नेमक्या कोणत्या आणि किती जागा मिळणार हे महायुतीत अधिकृत प्रवेश झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकतं. महायुतीला पुरक भूमिका राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घेतल्या होत्या. भाजपचे नेते देखील राज ठाकरेंच्या महायुतीतील प्रवेशाच्या चर्चेनं उत्सुक असल्याचं दिसून आलं आहे.
संबंधित बातम्या
महायुतीत नवा भिडू, राज ठाकरे, एकनाथ शिंदेंची चर्चा, देवेंद्र फडणवीस दाखल, लोकसभेसाठी प्लॅनिंग