राज-उद्धव एकत्र, ठाकरेंच्या बंधुच्या मनोमिलनावर अजित पवारांचं परखड भाष्य; पत्रकारांनाच लगावला टोला
राज्यात दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेसंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही एकमेकांच्या पक्षांचे प्रमुख आहेत.

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका मुलाखतीत, आमच्या दोघांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी आपली सर्वच तयारी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. त्यातच, गेल्या आठवडाभरात दोन्ही ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे पुन्हा ही चर्चा जोर धरू लागली आहे. आता, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनीही दोन्ही ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यासंदर्भातील प्रश्नावर भूमिका मांडली. अजित पवारांनी पुण्यात (Pune) पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. लाडकी बहीण योजना, आगामी निवडणुका, ठाकरे बंधु एकत्र यासह बीडमधील गुन्हेगारीच्या प्रश्नांवरही भूमिका मांडली.
राज्यात दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेसंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही एकमेकांच्या पक्षांचे प्रमुख आहेत. इंजिन आणि मशाल पक्षाच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा, हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही आणि मी विचार करून काय उपयोग आहे, असा टोलाही अजित पवारांनी पत्रकारांना लगावला. त्या त्या संदर्भातला निर्णय त्यांच्या-त्यांच्या पक्षाचे प्रमुख घेतील, असेही त्यांनी म्हटले.
तेव्हा जागावाटपाचा निर्णय घेऊ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता, ज्यावेळेस खरं फॉर्म भरण्याची वेळ येईल, त्यावेळेस महायुती म्हणून आम्ही तिघेही एकत्र बसू आणि जागावाटपाचं ठरवू. महायुतीमधील रामदास आठवले किंवा इतर सहकाऱ्यांना देखील सोबत घेऊ. त्यावेळेस जागावाटपाचं सांगू, आता इतकी घाई करण्याची काही गरज नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
संजय शिरसाटांना टोला
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्टेटमेंट दिलं आहे, ते तुम्ही ऐकलं नाही का? असा प्रति सवाल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच, मुख्यमंत्री जे बोलतात ते अंतिम असतं. कारण नसताना काहीजण चुकीची चर्चा करत आहेत. आम्हीही प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहोत. कुठल्याच घटकांवर अन्याय करणार, नाही सगळ्यांना नाही दिला जाईल, असे म्हणत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील चर्चेवर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला आपण यंदा 39 ते 41 टक्के वाढ करून अधिक निधी दिला आहे. माझं मंत्र्यांना सांगणं आहे की, कॅबिनेट बैठक असते इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्या व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडलं पाहिजे, तर समज गैरसमज होणार नाहीत. काही जण चुकून बोलून जातात, जर कोणाची तक्रार करायची असेल तर आम्हा सगळ्यांसमोर करा म्हणजे आम्हाला पण कळेल. जर का असं केलं नाही तर चुकीच्या बातमी लागतात, अशा बातम्यांना विषय मिळतो आणि बातम्या सुरू होतात, असे म्हणत अजित पवारांनी एकप्रकारे मंत्री संजय शिरसाट यांना माध्यमांशी बोलण्यापेक्षा मंत्रिमंडळ बैठकीत बोलण्याचा सल्ला दिलाय.
दरम्यान, आम्ही एकोपाने कारभार करत आहोत, त्याच्यामध्ये कुठे भांड्याला भांड लागत असेल तर आपण त्यातून मार्ग काढू. पण, कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, नागरिकांमध्ये, पत्रकारांमध्ये या ही गोष्टीला वाव देऊ नये, असेही अजित पवारांनी म्हटले.
हेही वाचा
उद्धव ठाकरेंनी एक कॉल करावा, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील, मनसेच्या दोन शिलेदारांनी पत्ते उघडले!
























