Raj Thackeray and Uddhav Thackeray: ठाकरे ब्रँड एकत्र यायला हवा, तो एस्टॅब्लिश व्हावा, कारण...; ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा अन् ज्येष्ठ शिवसैनिकाची भावनिक साद
Raj Thackeray and Uddhav Thackeray: हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने उघडलेला हा मोर्चा आहे. मराठी माणसाचं भाग्योदय परत होतंय, असे देखील ज्येष्ठ शिवसैनिकांनी म्हटले आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray : हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला होता. दोन स्वतंत्र मोर्चे न काढता, एकत्र येऊन या मुद्द्यावर लढा देण्याचा मनसेचा ठाम आग्रह होता. आता याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. हिंदी सक्तीविरोधात एकत्र आणि एकच मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. त्यांनी 'एक्स'वर याबाबत माहिती दिली आहे. या घोषणेमुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच व्यासपीठावर येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. आता या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळूंज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळूंज म्हणाले की, या दोन भावांना एकत्र यायला पंधरा वर्षे लागले. विठ्ठलाच्या भोवती बडवे आलेले राज ठाकरेंना आवडलं नव्हतं. मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी येत आहे. मराठी माणसाच्या रक्षणासाठी विठ्ठलच आला असावा. 2010 साली आम्ही म्हणत होतो की, चहा प्यायला तरी दोन भावांनी एकत्र यावं. जेणेकरून संवाद होईल. त्यातून काही मार्ग निघेल. मी म्हटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार तेव्हा ठाण्याची एक महिला आली आणि म्हणाली होती की हे दोन भाऊ एकत्र येतात का? वा चांगलं झालं. ही मराठी माणसाची भावना आहे, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे ब्रँड एकत्र यायला हवा
सतीश वळूंज पुढे म्हणाले की, आतापर्यंत दोन्ही भाऊ एकच मुद्द्यावर भांडत होते. मराठी माणूस होता, मराठी माणसाचे प्रश्न होते. हिंदी सक्ती विरोधात हा मराठी माणसाने उघडलेला मोर्चा आहे. मराठी माणसाचं भाग्योदय परत होतंय, असं मला वाटतं. दोन भाऊ एकत्र व्यासपीठावर असणार आहेत. ठाकरे ब्रँड एकत्र यायला हवा, तो एस्टॅब्लिश व्हायला हवा. कारण तो मराठी माणसासाठी आहे. पंधरा वर्षे लागली, देर आये दुरुस्त आये. आता गरज मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची आहे. मत त्रिभागली गेली आहेत. आणखी एक शिवसेना निर्माण झाली आहे, असेही त्यांनी म्हटले.
पाच जुलैला भावना उचंबळून येतील
बाळासाहेब ठाकरेंना वाटायचं की दोन भाऊ एकत्र यावेत. बाळासाहेबांना घाबरत आम्ही ही मोहीम सुरू केली होती की दोन भावाने एकत्र यावं. त्यांनी शेवटची मुलाखत दिली त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की पाण्यापर्यंत मी दोघांनाही नेतोय. दोघांनी ते एकत्र प्यायचं आहे. शंकाकुशंका निर्माण करण्यापेक्षा एक सकारात्मक पाऊल पुढे पडतंय. मराठी माणसांनी ताकद दाखवावी आणि हा शासन निर्णय मागे घ्यायला लावावा. पाच जुलैला भावना उचंबळून येतील, असे देखील सतीश वळूंज म्हणाले.
आणखी वाचा
























