(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, स्वा. सावरकरांविरोधात केलेलं वक्तव्य भोवणार?
Pune Session Court and Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लंडनमध्ये केलेलं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भोवण्याची शक्यता आहे.
Pune Session Court and Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लंडनमध्ये केलेलं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भोवण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले आहेत. कलम 204 अन्वये हे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडन येथील भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. आता राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयाच्या या आदेशानंतर स्वतः उपस्थित राहतात की वकिलामार्फत बाजू मांडतात हे पहावं लागेल.
सावरकरांचा अपमान केल्याचा राहुल गांधींवर आरोप
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याबाबत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पुण्यातील विश्रामबाग पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या
पोलिसांनी अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सीआरपीसी कलम 204 अंतर्गत नोटीस बजावली होती. सात्यकी सावरकर यांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 499 आणि 500 (मानहानी) अंतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयात धाव घेतली होती. विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
राहुल गांधींनी काय म्हटलं होतं ?
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. तक्रारीनुसार, राहुल गांधींनी भाषणात म्हटले की, सावरकरांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, मी माझ्या 5-6 मित्रांसोबत जात एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती. अशा केल्यानं मला आनंद झाला होता. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे खंडन केले होते. दरम्यान, राहुल गांधी आता पुणे सत्र न्यायालयात हजर होणार आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या