Ayodhya Pol : आमदार संतोष बांगर यांच्या घरासमोर शिवीगाळ आणि गोळीबार झाल्याचा दावा, ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर गुन्हा दाखल
Ayodhya Pol Vs Santosh Bangar : सत्ताधारी आमदार जनतेला खरं काय खोटं काय सांगणार का असा सवाल विचारणाऱ्या ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर फेसबुक पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली : कळमुनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या घरासमोर गोळीबार केल्याची फेसबुक पोस्ट करणं ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांना भोवलं आहे. अयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर 27 मे रोजी एका व्यक्तीने शिवीगाळ करत गोळीबार केल्याचा दावा ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पोळ यांनी केला आहे .
अयोध्या पोळ यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर हा दावा केला आहे. त्यांनी म्हटलंय की , संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शिवीगाळ आणि नंतर फायरिंग झालं होतं.
तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये अयोध्यो पोळ यांनी म्हटलंय की, हे प्रकरण दाबून ठेवलं जावं म्हणून संतोष बांगर यांच्याकडून काटेकोरपणे पालन केलं गेलं आहे. सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं हे सांगतील का असा सुद्धा सवाल आयोध्या पोळ यांनी आमदार बांगर यांना विचारला आहे.
अयोध्या पोळ यांनी केलेल्या दाव्यावर आमदार संतोष बांगर यांनीही प्रतिक्रिया दिली. असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा बांगर यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यावर अयोध्या पोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. आपल्याला प्रश्न विचारण्याऐवजी गुन्हा का दाखल केला असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला आहे.
काय म्हणाल्या अयोध्या पोळ?
हिंगोलीत माझ्यावर एका लोकप्रतिनिधीला प्रश्न केला म्हणून माझ्यावर अजून एक खोटा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ताई/पोलीस दादा अहो कायद्याने मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलाय, प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी गुन्हा दाखल करताय? हिंगोली पोलीसच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दडपणाखाली काम करतंय हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे. मुंबई पोलीस तथा महाराष्ट्र पोलीस दादाला एकच सांगणं आहे की माझ्यासोबत "अगरवाल" सारखी राजकीय व आर्थिक ताकद उभी नाही, आहे ते फक्त सामान्य माणसं व गरीब आईबाबा तेव्हा कोणीही कितीही "सत्तेचा गैरवापर" करुन माझ्यावर "खोटे गुन्हे" दाखल करा मी लढत राहिल. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.
ही बातमी वाचा: