(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नका, विखेंनी एका उद्योगपतीला निरोप घेऊन माझ्याकडे पाठवलं होतं; शरद पवारांचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला. स्टेजवर बसण्यासाठी खुर्ची नसल्याने मविआ उमेदवार निलेश लंके स्टेजवर खाली बसले
अहमदनगर: राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी देऊ नये म्हणून एका उद्योगपतीला निरोप घेऊन मााझ्याकडे पाठवले होते, असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. मी जाहीरपणाने आणि जबाबदारीने सांगतो की, विखे-पाटील यांनी तीन आठवड्यांपूर्वी मुंबईतील एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले होते. त्या उद्योगपतीला मी विचारले की, कसं येणं केलंत? त्यावर त्या उद्योगपतीने सांगितले की, विखे-पाटील आणि आमचे संबंध आहेत. त्यांनी मला सांगितले आहे की, काही करुन पवारांकडे जा. नगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या, अशी विनंती त्यांनी केल्याचे संबंधित उद्योगपतीने सांगितले. अहमदनगरसाठी निलेश लंके यांचे नाव आले तेव्हा विखे-पाटलांची झोप उडाली. विखे-पाटलांनी कधीही माझ्या दारात पाऊल टाकलं नाही, पण निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नये, यासाठी त्यांनी त्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले. यावरुन एक स्पष्ट होते की, सत्ता आणि साधनं असतील तरी माणुसकी, सामान्य माणसांचं प्रेम हा खजिना आहे. त्यामुळे निलेश लंकेंचा पराभव करणे शक्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
मी टीका करणाऱ्यांवर जास्त बोलणार नाही. पण माझ्यामुळे आणि बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांना कधी ना कधी मदत झाली आहे, ते (विखे) विसरले. या लोकांबद्दल काय सांगायचे, या लोकांनी किती पक्ष बदलले, पहिले शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, विरोधी पक्षनेतेपद उपभोगलं, ते सोडून दिलं आणि भाजपमध्ये आले. आता ते भाजपमध्ये मंत्री झाले आहेत, तरीही लोकांवर टीकाटिप्पणी करत आहेत. या लोकांना आत्मविश्वास नाही. निवडणुकीला उभं राहिल्यावर निलेश लंके यांच्यामुळे त्यांची चिंता नक्की वाढली असेल, असेही शरद पवार यांनी म्हटले.
संसदेत कोणत्याही भाषेत बोलता येतं; शरद पवारांचं सुजय विखेंना प्रत्युत्तर
सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांना इंग्रजी बोलता येत नाही, यावरुन हिणवले होते. सुजय विखेंच्या या वक्तव्याचा शरद पवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, संसदेत कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. मी अनेकदा संसदेत इंग्रजी, हिंदी आणि अगदी मराठीतही प्रश्न मांडले आहेत. तुमच्या भाषणाचं शब्दश: हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर केलं जाते, असे शरद पवार यांनी आवर्जून सांगितले.
आणखी वाचा