(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : पुणे, कोल्हापूर ते संभाजीनगर, बुलढाणा, राज ठाकरेंच्या मनसेकडून 21 मतदारसंघाचा आढावा, कुठे कुठे उमेदवार देणार?
MNS : राज्यातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात मनसे पक्षाची किती ताकद आहे?, कुठल्या जागा पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत?, कुठे पक्षाचे किती तयारी आहे? या सगळ्याची चर्चा या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) देखील कामाला लागली आहे. अशात मनसेची आज वांद्रे एमआयजी क्लब येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यातील जवळपास 21 लोकसभा मतदारसंघाचा आढावा स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला आहे. यामध्ये पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik), बुलढाणा (Buldhana), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), सोलापूर (Solapur) यासह 21लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने सर्वच पक्षाकडून यासाठी तयारी सुरु आहे. राज ठाकरे यांच्याकडून देखील लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत आज राज ठाकरेंनी एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली आहे. राज्यातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात मनसे पक्षाची किती ताकद आहे?, कुठल्या जागा पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत?, कुठे पक्षाचे किती तयारी आहे? या सगळ्याची चर्चा या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे.
निवडणूक स्वबळावर लढायची की युतीत...
मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अशात मनसेच्या आजच्या बैठकीत देखील युतीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवताना ती स्वबळावर लढवायची की समविचारी मित्र पक्षांसोबत जायचं?, याविषयी विविध लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा मत या आढावा बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाणून घेतलं आहे. याविषयी लेखी मत सुद्धा पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांचा जाणून घेतले जाणार आहे. त्यामुळे या आढावा बैठकीनंतर लोकसभा निवडणूक लढवण्या संदर्भातील पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
सगळ्याच मतदारसंघासंदर्भात विचार होऊ शकतो : नांदगावकर
या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "यापूर्वी 20 तारखेला पण बैठक झाली होती. आजच्या बैठकीत 21 ते 22 जागांचा पूर्ण आढावा घेण्यात आला आहे. पदाधिकारी, संघटक, समन्वयक, जिल्हाध्यक्ष सगळे बैठकीला उपस्थित होते. पुढच्या वाटचालीची वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. आत्ता नेत्यांची चर्चा होईल. महत्त्वाच्या सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. सगळ्याच मतदारसंघासंदर्भात विचार होऊ शकतो. सगळे अधिकार राज ठाकरेंचे आहेत. त्यांनी सहकाऱ्यांशी संवाद करून जाणून घेतलं, आत्ता नेत्यांशी चर्चा होईल, असे नांदगावकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल