काय सांगता! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत
Prithviraj Chavan On Income Tax Action : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या तिकिटासाठीही पक्षाकडे पैसे नसल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मुंबई: ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने (Income Tax) काँग्रेसचे (Congress) बँक खाते गोठवल्याने पक्ष आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. आता निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रवासाचा खर्च करण्यासाठी आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी पक्षाकडे पैसा नसल्याचा दावा ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) यावर चिंता व्यक्त करत देशभर प्रचारासाठी जाणाऱ्या नेत्यांच्या प्रवासासाठी तिकीट काढण्यासाठीही पैसे राहिले नसल्याचं सांगितलं होतं.
केंद्रीय आयकर विभागाने 2017 सालच्या प्रकरणावरून काँग्रेसवर कारवाई करत त्यांची बँक खाती गोठवली होती. तसेच पक्षाला 210 कोटी रुपयांचा दंडही लावला होता. ऐन निवडणुकीच्या काळात आयकर विभागाने केलेल्या या कारवाईवर टीका करत केंद्र सरकारच्या सांगण्यावरून ही सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाणांनी यावर प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयात अपील, पण लगेच निकाल शक्य नाही
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2017 सालच्या एका प्रकरणात आयकर विभागाने कारवाई करत काँग्रेसची चार बँक खाती गोठावली आहेत. त्यामुळे पक्षाला आता काहीही व्यवहार करता येत नाही. आयकर खात्याच्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टातली अपील केलं आहे, पण त्याचा निकाल लगेच लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. काँग्रेसचे नेते दिवंगत सिताराम केसरी यांच्या काळातीर, 1993 सालच्या एका हिशोबाची त्रुटी दाखवत एक नोटीस आयकर विभागाने बजावली आहे.
केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून काँग्रेसला अडचणीत आणण्याचा डाव
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. भाजपने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा कायदा बदलला, त्यांच्या मर्जीतले लोक आयोगात बसवले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुका या निष्पक्ष व्हायच्या असतील तर केंद्रीय यंत्रणांनी काँग्रेसला बँक खाती स्वतंत्रपणे वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. कोणताही राजकीय पक्ष हा आयकर विभागाच्या कक्षेत येत नाही, त्यामुळे ही कारवाई चुकीची असल्याचा दावाही त्यांनी केला.
ही बातमी वाचा: