(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित!
Goa: गोव्यात मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वतः असल्याची माहिती भाजपचे विधीमंडळ नेते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
Goa: गोव्यात मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वतः असल्याची माहिती भाजपचे विधीमंडळ नेते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत माहिती दिली गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान यांच्या उपलब्धतेनुसार शपथविधीची तारीख ठरवली जाईल, अशी माहिती यावेळी सावंत यांनी दिली आहे. रात्री उशिरा पणजीतील हॉटेलमध्ये खलबतं झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. शिवाय, मगोपलो सोबत घेतल्यानं भाजपमध्ये कुणीही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया देखील सावंत यांनी दिली.
सोमवारी भाजपने राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपला 3 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, 'मगोप'चा पाठिंबा आता भाजपची डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा आहे. 'मगोप'च्या पाठिंब्यावरून भाजपात दोन गट पटले असून अनेक आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा गोव्याच्या राजकारणात आता सुरू झाली आहे. जवळपास 50 टक्के आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे.
नाराज आमदारांची बैठक
भाजपने सोमवारी 'मगोप'च्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर, यातील काही आमदारांनी एक स्वतंत्र बैठक घेतली. यामध्ये प्रवीण आरलेकर, जोशुआ डिसुझा, प्रेमेंद शेठ, निलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, रवी नाईक, गोविंद गावडे, बाबुश मोंसरात यांचा समावेश होता. यावेळी सर्व आमदारांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.
नाराज आमदार - प्रमोद सावंतांची भेट
एका हॉटेलमध्ये नाराज आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर सर्व आमदारांनी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. पण, सावंत यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले.
'मगोप'ला विरोध का?
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपविरोधात तृणमुल काँग्रेसशी युती करत निवडणूक लढवली होती. परिणामी काही ठिकाणी भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, काही ठिकाणी मिळालेलं मताधिक्य हे खुपच कमी आहे. त्यामुळे सध्या भाजपच्या काही आमदारांमध्ये नाराजी आहे.