आमचे फोन आजही टॅप होताय, संजय राऊतांचा रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप; आता भाजप नेत्याचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
रश्मी शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचा अभय आहे. रश्मी शुक्ला यांची नेमणूकच बेकायदेशीर आहे. त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांना तडीपारीच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आता या आरोपावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय.
प्रवीण दरेकर म्हणाले की, संजय राऊतांना आरोप करण्याशिवाय काम नाही. मला वाटत नाही की फोन टॅपिंग होत असेल. संजय राऊतांकडे काय खळबळजनक गोष्टी असणार आहे का? काही करत नाही तर घाबरण्याची काय गरज? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काहीतरी विध्वंस करण्याचा डाव
संजय राऊत कांड करणारा नेता आहे. आपण काहीही करून पकडले जाऊ त्यामुळे हे सुरु आहे का? त्यामुळे थयथयाट सुरु आहे. काही तरी विध्वंस करण्याचा डाव यांचा दिसतोय. आपल्या गोष्टी निवडणुकीत सुरळीत करता येईल का? असा यांचा विचार दिसतोय. पोलीस त्यांचे काम करतील. महायुतीला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र उभं राहत आहे आणि त्यातून असे आरोप होत असल्याचा पलटवार प्रवीण दरेकर यांनी केलाय.
राऊतांकडे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्यावे
संजय राऊत यांच्या आरोपावर शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे असतील तर ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यावेत उगाचच एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर खोटे आरोप करू नये, अशा शब्दात संजय राऊतांना देसाई यांनी सुनावले आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना ठेवू नये अशी मागणी होतेय. मात्र निवडणूक आयोग म्हणते ते आमच्या हातात नाही. आमच्या लोकांना तडीपार करणे, त्रास देणे सुरु आहे. रश्मी शुक्ला यांना का आठवत नाही? त्यांचा मागील इतिहास चांगला नाही. त्यांच्यावर आरोप होते तरी फडणवीस यांनी त्यांना पदावर घेतले. आमचे अजूनही फोन टॅपिंग सुरु आहे. आमच्या मतदारसंघात आमच्या प्रतिनिधींना त्रास दिला जातो. शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचा अभय आहे. रश्मी शुक्ला यांची नेमणूकच बेकायदेशीर आहे. फडणवीस यांच्या बाजूने असलेल्या लोकांना त्या मदत करतात. बाकी सगळ्यांना तडीपार आणि त्रास देण्याचे काम करतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
आणखी वाचा