आजही गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो; बाप्पांच्या आगमनापूर्वीच प्रणिती शिंदेंची खंत, महिलांना आवाहन
संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वात इंदिरा महोत्सव घेण्यात आला, त्यावेळी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) बोलत होत्या
अहमदनगर : गणेशोत्सवाची सर्वत्र धुम पाहायला मिळत असून बाप्पांच्या स्वागताची जल्लोषात तयारी सुरू आहे. राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडूनही गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षांसाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार करत नेतेमंडळी दौरे करताना दिसून येते. तर, राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत योजनेवरुन विरोधकांकडून प्रतिसवालही केले जात आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी संगमनेर मतदारसंघात महिलांसाठी आयोजित मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. यावेळी, पुढील निवडणुकीत जयश्री थोरात यांना संधी मिळावी, असे वक्तव्य त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर, आजही आपल्याकडे घरात गणपती आणताना मुलाच्याच हातावर किंवा डोक्यावर असतो, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.
संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वात इंदिरा महोत्सव घेण्यात आला, त्यावेळी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, महिला आपल्या ताकदीचा वापर कमी करतात. महिलांमध्ये दैवी शक्ती असते. म्हणून त्या बाळाला जन्म देतात. मात्र, अन्याय झाला तर आपण आपल्या शक्तीचा वापर करत नाही. ज्यावेळी बालकांवर अत्याचार होतात तेव्हा विचार करण्याची वेळ येते. महिलांच्या प्रश्नाविषयी संसदेत देखील महिलाच बोलतात, पण हे बदलण्याची आज गरज आहे, असे खासदार प्रणिती यांनी म्हटले. तसेच, आपण देखील मुलींना घरी सल्ले देतो, मुलांना काही सांगत नाही. मुलांना देखील समजावून सांगायला पाहिजे. हे बदललं तर अत्याचार कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आजही गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो, आता मुलींना देखील त्याच्या बरोबर उभं करा, असे म्हणत काही परंपरांमध्ये बदल करण्याची भूमिका त्यांनी बोलून दाखवली. महिला एकत्रित आल्या तर शक्तीपीठ निर्माण होतं. ज्योतिर्लिंगपेक्षा जास्त ताकद शक्तिपीठात आहे, असेही त्यांनी म्हटले.
लाडकी बहीण कधी सावत्र होईल खात्री नाही
नवरा सगळा पगार देतो, त्याचं बायको ऐकत नाही तर यांचे कोण ऐकणार? असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधाऱ्यांना सुनावलं. लाडकी बहीण उद्या सावत्र होईल याची खात्री नाही. म्हणूनच ते निवडणुका घेत नाहीत. नवरा सगळा पगार देतो, त्याचं ऐकत नाहीत, तर यांचे कोण ऐकणार? असा खोचक म्हणत प्रणिती शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा
आरोपी अद्याप फरार का?; बदलापूर घटनेवरुन हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे, मीरा बोरवणकरांचा उल्लेख