VBA: साताऱ्यात धनगर उमेदवार, हातकणंगलेत जैन आणि धुळ्यात मुस्लीम; वंचितच्या दुसऱ्या यादीत आंबेडकरांकडून सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला कायम
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीत युतीची बोलणी सुरु होती. मात्र, ही बोलणी फिस्कटल्यानंतर वंचितने लोकसभा निवडणुकीसाठी आपले 19 उमेदवार जाहीर केले आहेत.
मुंबई: वंचित बहुजन आघाडीकडून रविवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये एकूण 11 जणांचा समावेश आहे. महाविकास आघाडीशी युतीची बोलणी सुरु असताना प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 27 मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षाकडे जिंकण्याइतपत ताकद असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक-एक करुन आपले पत्ते उघड करायला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत लोकसभेच्या 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या उमेदवार यादीप्रमाणेच वंचितच्या दुसऱ्या यादीतही प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला कायम ठेवला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच आपल्या पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी देताना सर्व जातीघटकांना स्थान दिले जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार वंचितच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत संबंधित नेत्याच्या नावापुढे त्याच्या जातीचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जात आहे. वंचितच्या दुसऱ्या लोकसभा उमेदवार यादीवर नजर टाकल्यासही ही बाब पाहायला मिळते. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची निवड करताना आजपर्यंतच्या प्रचलित राजकीय आडाखे मोडीत काढले आहेत. वंचितच्या दुसऱ्या यादीनुसार, सोलापूरमध्ये बौद्ध समाजाच्या राहुल गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. तर धुळ्यातून मुस्लीम समाजाच्या अब्दुल रेहमान आणि उत्तर मध्य मुंबईतून अबुल हसन खान यांना संधी देण्यात आली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कुणबी समाजाच्या काका जोशी यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय, हिंगोलीतून डॉ. बी.डी. चव्हाण (बंजारा), लातूरमधून नरिसिंहराव उदगीरकर (मातंग), जालन्यातून प्रभाकर देवमन बकले (धनगर) यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात राहुल गायकवाड यांना उमेदवारी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपच्या राम शिंदे यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून वंचितने राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गायकवाड हे अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात प्रकाश आंबेडकर स्वत: उमेदवार होते. परंतु, यंदा वंचितने सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीतील लोकसभेचे उमेदवार कोण?
हिंगोली - डॉ. बी.डी. चव्हाण - बंजारा
लातूर - नरिसिंहराव उदगीरकर - मातंग
सोलापूर - राहुल काशिनाथ गायकवाड - बौद्ध
माढा - रमेश नागनाथ बारसकर - माळी (लिंगायत)
सातारा - मारुती धोंडीराम जानकर - धनगर
धुळे - अब्दुल रहमान - मुस्लीम
हातकणंगले - दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील - जैन
रावेर - संजय पंडीत ब्राम्हणे - बौद्ध
जालना - प्रभाकर देवमन बकले - धनगर
मुंबई उत्तर मध्य - अबुल हसन खान - मुस्लीम
रत्नागिरी सिंधुदुर्ग - काका जोशी - कुणबी
आणखी वाचा