Ramesh Baraskar : वंचितच्या उमेदवारामुळे माढ्यात मविआच्या अडचणी वाढणार, रमेश बारसकर ओबीसी मतांचं गणित बिघडवणार
Madha Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारामुळे माढा लोकसभेत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत. रमेश बारसकर हे ओबीसी मतांचे महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार असल्याचं बोललं जात आहे.
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) एक नवीन ट्विस्ट आला असून यामुळे महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाबाजूला शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून अजून माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Election 2024) उमेदवार निश्चित झाला नसताना ओबीसी आंदोलनातील नेते आणि मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर (Ramesh Baraskar) यांना वंचितने (Vanchit) उमेदवारी घोषित केल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत. रमेश बारसकर हे ओबीसी नेते म्हणून जिल्ह्यात परिचित असून त्यांच्या उमेदवारीमुळे वंचितांच्या मतांसोबत धनगर आणि ओबीसी मतांचा मोठा टक्का बारसकर यांच्या पाठीशी जाण्याची शक्यता आहे.
माढ्यात मविआच्या अडचणी वाढणार
काही दिवसांपूर्वी बारसकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना घेऊन माढा येथे विराट ओबीसी एल्गार मेळावा घेत आपली ताकद दाखवून दिली होती. यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून थेट बारसकर यांची उमेदवारी घोषित करीत महाविकास आघाडीला अडचणीत आणलं आहे. आपण अजूनही महाविकास आघाडी सोडली नाही, अशी वक्तव्ये करणारे प्रकाश आंबेडकर एकापाठोपाठ एक उमेदवारांच्या नावांची घोषणा करू लागल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत.
वंचितच्या उमेदवाराची महाविकास आघाडीला डोकेदुखी
प्रकाश आंबेडकर यांच्यामागे मोठा मतांचा गठ्ठा असून गेल्यावेळी ऐनवेळी ऍड विजय मोरे यांना उमेदवारी देऊन त्यांना 51532 मते मिळाली होती. यावेळी जाहीर झालेले उमेदवार हे ओबीसी चळवळीतले नेते असल्याने सर्व लहान-मोठ्या जाती आणि संघटनांमध्ये बारसकर यांचा थेट संबंध आहे. माढा लोकसभा मतदारसंघात 38 टक्के धनगर समाज असून 19 टक्के ओबीसी समाज आहे. याचं नेमकं गणित घालण्याचा प्रयत्न आंबेडकर यांनी केला असून त्यांचं गणित व्यवस्थित कामाला आलं, तर माढा लोकसभा मतदारसंघात विजय मिळू शकतो. यामुळेच शरद पवार हे वारंवार माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर उमेदवार देण्याचे संकेत देत आहेत.
रमेश बारसकर ओबीसी मतांचं गणित बिघडवणार
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने त्यांना याचा फायद्या पेक्षा तोटा होईल, अशी भाजपाची गणिते आहेत. एकंदर वंचितच्या ओबीसी उमेदवारीने महाविकास आघाडीची गणिते बिघडणार असे चित्र असून आता रमेश बारसकर यांच्या उमेदवारीनंतर धनगर आणि ओबीसी मतांचा मोठा टक्का कोणाच्या मागे जातो, यावर भाजप आणि महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र 2019 प्रमाणे 2024 मध्येही माढा लोकसभा मतदारसंघात वंचित महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार असं चित्र आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :