Prakash Ambedkar : मुस्लिम मतांसाठी प्रकाश आंबेडकरांचा 'मेगा प्लॅन', 'महाविकास आघाडी'ला फटका बसण्याची शक्यता
Prakash Ambedkar : आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार देऊन प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला घेरण्याची रणनिती आखलीये.
Prakash Ambedkar, अकोला : मुंबई येथील प्रकाश आंबेडकरांचं निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'वर आज (दि.9) वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत 'वंचित'नं आपल्या दहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतील सर्वच्या सर्व 10 उमेदवार हे मुस्लिम समाजातील आहेत. या दहा उमेदवारांमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधून काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांना वंचितची उमेदवारी जाहीर करीत आंबेडकरांनी मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मुस्लिमांनी भरभरून मतदान केलं होतं. महाविकास आघाडीच्या याच 'व्होट बँके'ला आता आंबेडकरांनी आपलं लक्ष्य केलंय. राज्यातील 288 पैकी किमान 50 मतदारसंघात आंबेडकर मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आंबेडकर आहेत. यासाठी आंबेडकरांचं सर्वच राजकीय पक्षातल्या मातब्बर मुस्लीम नेत्यांकडे लक्ष आहे. आपल्या या राजकीय खेळीतून आंबेडकर मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात दलित, मुस्लिम, ओबीसी आणि छोट्या समाज घटकांची राजकीय 'मोट' बांधत लोकसभेतील अपयश धुऊन काढण्याचा आंबेडकरांचा 'मेगा प्लॅन' आहे. त्याचाच संदेश आंबेडकरांनी आपल्या दुसऱ्या उमेदवार यादीतून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आंबेडकरांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील अकरा उमेदवारांपैकी एक उमेदवार मुस्लिम समुदायातील होता. तर दुसऱ्या यादीतील सर्वच्या सर्व दहा उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत. त्यामुळे आंबेडकरांनी आत्तापर्यंत जाहीर केलेल्या 21 उमेदवारांपैकी तब्बल 11 उमेदवार एकट्या मुस्लिम समुदायातील आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे गेलेला मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी आता प्रकाश आंबेडकरांनी कंबर कसल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात निर्माण झालं आहे.
वंचितच्या दोन्ही याद्यांतील मुस्लिम उमेदवार
1. नांदेड दक्षिण - फारूक अहमद
2. बाळापुर - नातिकोद्दीन खतीब
3. मलकापूर - शहेजाद खान
4 .परभणी - सय्यद समी
5. छ. संभाजीनगर मध्य - मो. जाविद
6. गंगापूर - सय्यद गुलाम नबी
7. कल्याण पश्चिम - अयाज गुलजार मौलवी
8. हडपसर - ॲड. मो. अफरोज मुल्ला
9. माण - इम्तियाज जफर नदाफ
10. शिरोळ - आरिफ मोहम्मदअली पटेल
11. सांगली - अलाउद्दीन हयातचंद काझी
विधानसभा निवडणुकीत आंबेडकरांची दलित, मुस्लिम, ओबीसी आणि मायक्रो मायनॉरिटीची 'राजकीय मोट'
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर मोठी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. यासाठी राज्यातील मुस्लिमांची संख्या निर्णायक असलेल्या मतदारसंघात ते मुस्लिम उमेदवार देण्यात तयारीत आहेत. राज्यातील अशा किमान 50 मतदारसंघात ते मुस्लिम उमेदवार उतरवणार असल्याची माहिती 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यातील 11 उमेदवार त्यांनी आतापर्यंत जाहीर केले आहेत. उर्वरित जागांवर इतर पक्षातील मातब्बर मुस्लीम नेत्यांच्या शोधात वंचित बहुजन आघाडी असल्याची माहिती आहे. सध्या मुस्लिम समाज ही राजकारणातील 'गठ्ठा मतपेढी' आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचा हा गठ्ठा आपल्याकडे असावा, अशी प्रकाश आंबेडकरांची राजकीय खेळी असण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय खेळीचा महाविकास आघाडीला फटका?
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांमुळे महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळालं. 48 पैकी तब्बल 31 जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्यात. महाविकास आघाडीचे राजकीय यशामागे मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. महाविकास आघाडीच्या याच मतपेढीवर आता प्रकाश आंबेडकरांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. 50 मतदारसंघात मुस्लिम उमेदवार उतरून मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न आहे. याला दलित मतदारांची सोबत घेत आंबेडकरांना लोकसभेत आपला तुटलेला जनाधार परत मिळवायचा आहे. राज्यातील सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत 15 ते 20 आमदार निवडून आणत आपलं राजकीय महत्त्व अबाधित ठेवण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न आहे.
आंबेडकरांच्या खेळीने अकोल्यात राजकीय भूकंप?
'वंचित'ने आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत बाळापुरातून नातिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते असलेल्या माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी आजच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. खतीब विधान परिषदेचे माजी आमदार असून आणि काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आहेत. गेल्या साठ वर्षांपासून बाळापुर नगरपालिकेवर खतीब घराण्याची सत्ता आहे. 2009 आणि 14 च्या विधानसभा निवडणुकीत खतीब कुटुंबीयांच अत्यल्प मतांनी पराभव झाला आहे. 2009 मध्ये खतीब यांच्या पत्नी तर 2014 मध्ये स्वतः खतीब बाळापुरातून काँग्रेसचे उमेदवार होते. बाळापुर मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे सध्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या वाट्याला जाणार असल्याने खतिबांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली आहे. खतीब यांच्या वंचितमधील प्रवेशाने बाळापुर मतदार संघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. खतीब यांच्या काँग्रेस सोडण्याने अकोल्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
प्रकाश आंबेडकरांसाठी आगामी विधानसभा निवडणूक त्यांचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा तुटलेला जनाधार आणि कमी झालेली मतं विधानसभेत मिळवली तरच त्यांची पुढची राजकीय वाटचाल सुखकर होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या मनात असलेल्या दलित, मुस्लिम, ओबीसी आणि मायक्रोमायनॉरिटी या आघाडीचा त्यांना त्यांच्या पक्षाला कसा फायदा होणार आहे?, याचे उत्तर भविष्यात मिळणार आहे. मात्र, आंबेडकरांच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीत नक्कीच काही प्रमाणात चलबिचल निर्माण होण्याची चिन्ह आहेय, हे निश्चित...
इतर महत्त्वाच्या बातम्या