(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोर्टाचा निकाल: कॉंग्रेसकडून निवडणूक लढवत BRS मध्ये सामील, कार्यकाळ संपण्याआधी गेली आमदारकी
BRS MLA Disqualified : निकाल देतांना राव यांना अपात्र ठरवत न्यायालयाने दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळालेल्या उमेदवाराला निवडून आल्याचे घोषित केले आहे.
BRS MLA Disqualified : महाराष्ट्रातील शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर प्रकरण न्यायालयात गेले असून, लवकरच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष निकाल देण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदारकीचा कार्यकाळ संपण्यास अवघे चार महिने शिल्लक असताना भारत राष्ट्र समितीचे (BRS) तेलंगणातील कोठागुडम मतदारसंघातील आमदार वनमा व्यंकटेश्वर राव (MLA Vanama Venkateswara Rao) यांना उच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. विशेष म्हणजे राव यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवत, पुढे इतर 12 आमदारांसह बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. तर पराभूत उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर निकाल देतांना राव यांना अपात्र ठरवत न्यायालयाने दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळालेल्या उमेदवाराला निवडून आल्याचे घोषित केले आहे.
2018 साली तेलंगणातील विधानसभा निवडणुका झाल्या. दरम्यान मूळ काँग्रेसचे उमेदवार म्हणून परिचित असलेले वनमा व्यंकटेश्वर राव कोठागुडम मतदारसंघातून निवडून आले. यावेळी त्यांनी बीआरएस पक्षाचे उमेदवार जलगम व्यंकट राव यांचा पराभव केला होता. मात्र, पुढे राव हे पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई टाळून इतर 12 आमदारांसह बीआरएसमध्ये सामील झाले होते.
दरम्यान, वनमा व्यंकटेश्वर राव यांनी त्यांच्या व पत्नीच्या मालमत्तेचा काही तपशील निवडणूक आयोगापासून दडवून ठेवला असा आरोप करत पराभूत उमेदवार जलगम व्यंकट राव यांनी न्यायालयात खटला दाखल केला. यावरून गेल्या काही दिवसांपासून न्यायालयात सुनावण्या झाल्या. न्यायालयाने दोन्ही बाजू जाणून घेत पुरावे तपासले. तर या प्रकरणात निकाल देतांना न्यायालयाने वनमा व्यंकटेश्वर राव यांना अपात्र ठरवले आहे.
पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला
वनमा व्यंकटेश्वर राव यांनी त्यांच्या व पत्नीच्या मालमत्तेचा काही तपशील निवडणूक आयोगापासून दडवून ठेवला असल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांना न्या. राधा राणी यांनी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आमदारपदाच्या कार्यकाळात वनमा व्यंकटेश्वर राव यांना विविध भत्त्यांसह दर महिना मिळालेले 3 लाख रुपयांचे उत्पन्न मात्र वसूल न करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
पराभूत उमेदवाराला मिळाली आमदारकी...
वनमा व्यंकटेश्वर राव यांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काही तपशील निवडणूक आयोगापासून दडवून ठेवला असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले आहे. मात्र याचवेळी दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळालेले उमेदवार असलेले जलगम व्यंकट राव यांना निवडून आल्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे जलगम राव यांना आमदारकी मिळाली आहे. विशेष म्हणजे तेलंगणात विधानसभा निवडणुका लवकरच होणार असून, यासाठी अंदाजे चार महिन्याचा काल शिल्लक राहिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :