Amol Kolhe: पिंपरीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या फ्री पाससाठी पोलिसांची धमकी; महानाट्याच्या मंचावरून डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, फडणवीसांनी....
Amol Kolhe: पिंपरीत शिवपुत्र संभाजी महानाट्याचं सादरीकरण सुरू आहे. महानाट्याच्या फ्री पाससाठी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.
Pune: पिंपरी-चिंचवड शहरातील एचए मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचं सादरीकरण सुरु आहे. या महानाट्याचा मोफत पास मिळावा म्हणून पिंपरी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे. नाटकाचे पास दिले नाही तर सादरीकरण कसं होतं ते बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याची माहिती त्यांनी देत खंत व्यक्त केली आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या मंचावरून खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संबंधित पोलिसांना समज द्यावी,असं आवाहनही त्यांनी केलं.
वर्दी ही जबाबदारीची असते याची जाणीव ठेवावी, असं डॉ. अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितलं. अद्याप फ्री पास मागितलेल्या त्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचं नाव समोर आलेलं नाही. परंतु या प्रकारामुळे पोलिसाची मान निश्चितच झुकल्याचं बोललं जात आहे.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, जर एखादा पोलीस बांधव मोफत पास मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कसा सादर होतो हे बघतो, अशी धमकी देत असेल तर माननीय गृहमंत्री महोदयांनी त्यांना समज द्यावी. अंगावर आलेली वर्दी ही केवळ अधिकाराची नाही, ती त्याहीपेक्षा जास्त जबाबदारीची आहे, याचं त्यांनी भान ठेवावं अशी माझी हात जोडून विनंती आहे, असंही ते म्हणाले. तर तिकीट काढून आलेल्या प्रत्येक पालकासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी मी मानाचा मुजरा करतो, असं वक्तव्य त्यांनी केलं.
जर फ्री पास हवा असेल तर कृपया एकदा या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात धावून दाखवा. 4 ते 5 एन्ट्री ज्या खालून वर, वरुन खाली करायच्या असतात, त्या 20 सेकंदांत एन्ट्री घेऊन दाखवा, असं म्हणत अमोल कोल्हेंनी आपला रोष व्यक्त केला. सादरीकरणासाठी अनेक जण परिश्रम घेतात. यामागे प्रचंड मेहनत आहे, परिश्रम आहे, या परिश्रमांचा एकदा विचार करा, अशी विनंती अमोल कोल्हेंनी केली.
घडलेल्या प्रकारामुळे वाईट वाटल्यांची खंत त्यांनी पुन:पुन्हा मंचावर व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हॉटेलमध्ये गेलात तर जेवणाचं बिल माफ करा म्हणत नाही, ढाब्यावर, पिकनिकला गेलात तर तिथलं बिल माफ करा म्हणत नाही, असं म्हणत फ्री पास मागणाऱ्या पोलिसांवर कोल्हेंनी आपला राग व्यक्त केला.
इथे मी केवळ फक्त आणि फक्त शिवशंभू म्हणून सादरीकरण करतो, ना कुठला प्रोटोकॉल असतो, ना कुठली सिक्युरिटी असते, इतकंच कशाला तर तुमच्या खाकी वर्दीचा मला प्रचंड अभिमान आहे, मला प्रचंड आदर आहे म्हणून मी पर्सनल पोलीस सिक्युरिटी गार्डसुद्धा घेत नाही आणि आज तुमच्यामुळेच मला इथे येऊन बोलावं लागलं, याचं मनापासून खरंच वाईट वाटल्याचं खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
कृपया मोफत पास मागू नका, अशी विनंती त्यांनी केली. पास दिला नाही तर नाटक कसं सुरू राहिल बघतो अशी धमकी महाराष्ट्राच्या मातीत एका पोलीस बांधवाने देणं दुर्दैवी आहे आणि याची दखल माननीय गृहमंत्र्यांनी जरुर घ्यावी, अशी विनंती खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केली आणि पुन्हा एकदा तिकीट काढून आलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले.
हेही वाचा: