(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठच्या आवारातील सुरक्षा भिंत पाडली जाणार, ठाकरे गटाचा विरोध
PM Narendra Modi Visit Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 19 जानेवारीच्या मुंबई दौऱ्यात वांद्रे कुर्ला संकुल याठिकाणी एमएमआरडीए मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
PM Narendra Modi Visit Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 19 जानेवारीच्या मुंबई दौऱ्यात वांद्रे कुर्ला संकुल याठिकाणी एमएमआरडीए मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. वांद्रे कुर्ला संकु संकुलनात एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्किंग व्यवस्था मुंबई विद्यापीठात करण्यात आली आहे. यासाठी मुंबई विद्यापीठच्या आवारातील सुरक्षा भिंत तात्पुरती पाडली जाणार आहे. यातच आता युवासेना ठाकरे गटाने भिंत पाडण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची व्यवस्था ही विद्यापीठात केली जाणार असून या कार्यक्रमसाठी आलेल्या नागरिकांची ये-जा करण्यासाठी विद्यापीठ आवारातील कंपाउंड वॉल तोडण्यात येणार आहे. त्यानंतर ही कंपाउंड वॉल बीएमसीकडून बांधून दिली जाणार आहे, असं आश्वासन पत्रात देण्यात आलं आहे.
याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एमएमआरडीए मैदानावर आहे. यावेळी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे संजय उपाध्याय, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिन जोशी, प्रवक्त्या शितल म्हात्रे, सुशांत शेलार आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले आहेत की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईत येत आहेत. खऱ्या अर्थाने मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आणि लोकार्पण करण्यासाठी ते येत आहेत. वर्षानुवर्षे मुंबईकरांची चांगले रस्ते ही मागणी होती. ती आमची आवश्यकता आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्यांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून होत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात निर्देश दिले आहेत. मुंबईचे पर्यटन आणि पर्यावरण चांगले व्हावे यासाठी शिवरेज ट्रीटमेंट प्लॅनला 28 हजार कोटी रुपये देण्यात आले. येथील अधिकृत फेरीवाला जो आहे, त्याला प्रथम 10 हजार रुपये आणि नंतर 30 हजार रुपयांची मदत ही एक लाख फेरीवालांना पोहोचणार आहे. हॉस्पिटलच्या निर्मिती सोबत दोन मेट्रो लाईन सुरु होत आहेत. यासाठी मोदीजी , शिंदे आणि फडणवीस यांच्या या अभियानात मुंबईकर जोडले गेले पाहिजेत, यासाठी हा संवाद रथ आहे.''
मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांमध्ये बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असतानाच बीकेसी येथे होणाऱ्या ठिकाणी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुंबई पोलिस कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांची एकत्रित बैठक पार पडली.
- सभेत व्हीआयपीमध्ये असणाऱ्या लोकांनी कोरोनासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.
- व्हीआयपी व्यवस्थेत येणाऱ्यांनी आरटी-पीसीआर केली जाणार, ऐनवेळी प्रवेश करणाऱ्यांची देखील रॅपिड टेस्ट केली जाणार.
- कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या विशेष टीम कार्यरत असणार.