
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान मोदींच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार, 2 दिवसात 6 सभा
PM Narendra Modi Visit in Maharashtra : 29 आणि 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या 6 सभांचे आयोजन करण्यात आलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. आज आणि उद्या दोन दिवसात पंतप्रधान मोदींच्या 6 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. 29 आणि 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सहा सभांचे आयोजन करण्यात आलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आज आणि उद्या मोदींच्या सभांचा धडाका
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात दोन दिवसांत 29 आणि 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर,कराड आणि पुणे येथे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे प्रचारसभा होणार आहेत.
दोन दिवसात सहा सभा
बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दोन दिवसांतील सभांच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी दीड वाजता होम मैदान येथे, कराड येथे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ होणारी सभा दुपारी 3:45 वाजता, पुणे येथील सभा संध्याकाळी 5:45 वाजता हडपसर येथे रेसकोर्स मैदानावर होणार आहे. ही सभा पुण्याचे महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ होणार आहे.
मोदींच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार
30 एप्रिल मंगळवारी दुपारी 11:45 वाजता माढामधील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे, दुपारी दीड वाजता धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यासाठी, तर दुपारी 3 वाजता लातूर येथे भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा होणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
मोदींच्या सभांची जय्यत तयारी सुरु
भाजप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांच्या सभांची जय्यत तयारी सुरु आहे. सोलापूरमध्ये सचिन कल्याणशेट्टी, नरेंद्र काळे, कराडमध्ये धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, पुण्यात राजेश पांडे, जयंत येरवडेकर, धीरज घाटे, माळशिरसमध्ये जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, धाराशिवमधअये राणाजगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड, अरविंद निलंगेकर या नेत्यांवर सभांच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
