(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi: मावळत्या सूर्याच्या साक्षीने खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा देण्याची वेळ आलीय, मोदींचा माढ्यात शरद पवारांवर हल्लाबोल
Madha Loksabha: मातब्बर-मातब्बर उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना हिणवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यातील भाषणात शरद पवार यांना शेतकरी हिताच्या मुद्यांवरुन लक्ष्य केले. आज सलग दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
माळशिरस: माढ्यात 15 वर्षांपूर्वी एक मातब्बर नेता निवडणूक लढण्यासाठी आला होता. त्यावेळीचे लोक सांगतात की, या बड्या नेत्याने तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने माढ्यातील (Madha Loksabha) दुष्काळी भागाला पाणी देण्याची शपथ घेतली होती. पण त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. मग अशा लोकांना तुम्ही शिक्षा देणार नाही का? त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य करत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी माढ्याच्या सभेत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पुण्यातील सभेत शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या केंद्रीय कृषीमंत्रिपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. देशात काँग्रेसचे सरकार असताना येथील मातब्बर नेते देशाचे कृषीमंत्री होते. तेव्हा ऊसाच्या एफआरपीचा दर 200 रुपये इतका होता. मात्र, आज मोदी सरकारच्या काळात उसाचा एफआरपी प्रतिक्विंटल 340 रुपये इतका आहे. हा मातब्बर नेता कृषीमंत्री होता तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकलेल्या बिलांचे पैसे मिळवण्यासाठी साखर आयोगाच्या कार्यालयात खेटे मारायला लागायचे. मात्र, आज देशात ऊसाचा थकित एफआरपी 100 टक्के दिला जातो. 2014 मध्ये ऊसाच्या थकित एफआरपीसाठी 57 हजार कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली होती. यंदा हीच रक्कम 1 लाख 14 कोटी इतकी आहे. त्यापैकी 32 हजार कोटी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
मी शरद पवारांना वारंवार ती गोष्ट सांगितली पण त्यांनी ऐकलं नाही: नरेंद्र मोदी
देशात नव्वदीच्या दशकापासून प्राप्तिकरामुळे साखर कारखाने त्रस्त होते. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मोदींना वारंवार समजवायचो की, तुमच्या महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने आहेत, आमच्या गुजरातमध्येही आहेत. येथील साखर कारखान्यांची प्राप्तीकराची समस्या मी अनेकदा त्यांच्यासमोर मांडली होती. पण कृषीमंत्री असताना 2014 पूर्वी शरद पवारांनी ही समस्या सोडवली नाही. आमचं सरकार आल्यावर आम्ही ही समस्या निकालात काढली. आम्ही साखर कारखान्यांना 10 हजार कोटींचा दिलासा देऊन जुना प्राप्तीकर माफ केला. याचा मोठा फायदा ऊस उत्पादकांना मिळाला, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.
आणखी वाचा
माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतून मुक्त करणार, देवेंद्र फडणवीसांचा मोहित-पाटलांवर थेट वार