Eknath Shinde: मोदीजी म्हणाले, तुमचा आवाज बसणार, गुळण्या करा; पंतप्रधानांच्या आपुलकीने मुख्यमंत्री शिंदे भारावले
Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईत येणार आहेत. मुंबईतील घाटकोपर परिसरात मोदींचा रोड शो होणार आहे. नाशिक आणि कल्याणमध्ये मोदींची सभा होणार आहे. मोदींनी एकनाथ शिंदेंना दिला नाकात गाईचे तूप टाकण्याचा सल्ला
मुंबई: अलीकडच्या काळात मी पंतप्रधान मोदी यांना भेटत होतो तेव्हा ते सतत सांगत होते की, तुझा आवाज बसणार आहे. त्यांनी एक-दोनदा सांगितले तेव्हा काही झालं नाही, पण तिसऱ्या वेळी त्यांनी सांगितल्यावर माझा आवाज खरोखरच बसला. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी मला भेटल्यानंतर स्वत:ची काळजी घ्या, थोडी झोप घ्या, असे सांगितले. त्यांनी मला रात्री गुळण्या करण्याचा, नाकात गाईचं तूप टाकण्याचा सल्ला दिला. एवढा मोठा पंतप्रधान पण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा विचार करतो, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जैन समाजाच्या (Jain Community) मेळाव्यात बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची मुक्तकंठाने तारीफ केली. मोदींच्या मनात आपल्यासोबतच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांविषयी कशी आपलुकी आहे, शिंदेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. मला अभिमान आहे की, अशा पंतप्रधानांसोबत आम्ही करत आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा विकास करत आहोत, असेही शिंदेंनी म्हटले.
घरी बसून, फेसबुक लाईव्ह करुन सरकार चालतं का? शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. तुम्ही अडीच वर्षांपूर्वीचं सरकार पाहिलं असेल. त्यावेळी सगळं बंद होतं, व्यापार बंद होता, तुम्हाला अखेर मोर्चा काढावा लागला. तुम्हाला घरी बसायला चांगलं वाटतं म्हणून सगळ्यांना घरी बसवायचं का?, असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. कोरोनाच्या काळात हा एकनाथ शिंदे पीपीई किट घालून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वाटत होता, लसी वाटत होता, रेमडिसिव्हीर इंजेक्शन वाटत होता. फेसबुक लाईव्हने राज्य चालतं का? राज्यात फिरुन लोकांचं दु:ख ऐकावं लागतं. पण महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात मंदिरं आणि दुकानं बंद होती. आम्ही राज्यातील सरकार बदलले तेव्हा मी आचार्यजींच्या संपर्कात होतो. आमचं सरकार येण्यात त्यांचंही योगदान आहे, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.
पंतप्रधान मोदींचा मुंबईत रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपर परिसरात रोड शो करणार आहेत. घाटकोपरच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरून घाटकोपर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या महात्मा गांधी मार्गाकडे जाणाऱ्या संपूर्ण मार्गावर बॅरिकेटिंग उभ्या करण्यात आल्या आहेत. मोदींच्या रोड शोमुळे एलबीएस रोड दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहील. मोदी येणार असल्याने या मार्गावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात आहे.
आणखी वाचा