नवनीत राणांचे सिटी स्कॅन करताना फोटो व्हायरल; लिलावती रुग्णालयास पालिकेची नोटीस, 48 तासांत उत्तर देण्याचे निर्देश
Lilavati Hospital: कारागृहातून बाहेर पडल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.
Lilavati Hospital: कारागृहातून बाहेर पडल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी रुग्णालयात नवनीत राणा यांचे एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडीओ शुटींग आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता सीटी स्कॅन करताना फोटो काढणे नियमांचे उल्लंघन असल्याने पालिकेच्या एच पश्चिम विभागाने लीलावती रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पालिकेने रुग्णालयाला पुढील 48 तासांत नोटीसीचे उत्तर द्या, असे निर्देश दिले आहेत.
तत्पूर्वी राणा यांचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्यानंतर आज शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास चांगलचं धारेवर धरलं. याविषयी रुग्णालयाने स्पष्टीकरण देण्याची मागणी करत राणांवर झालेल्या उपचारांविषयी शंका उपस्थित करण्यात आली. नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) , शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला होता. त्यानंतर आता रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे.
यावेळी रुग्णालयाला जाब विचारतानाच किशोरी पेडणेकर यांनी नवनित राणा यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ''स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना आणि रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणं, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केलं. असंच दिसतंय.''
राणा दांपत्याला पुन्हा होणार अटक?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून उद्धभवलेल्या वादानंतर तुरुंगवारी करावी लागली होती. आता पुन्हा एकदा राज्य सरकार राणा दाम्पत्याला तुरुंगात पुन्हा पाठवायची तयारी केली आहे. जामीन देताना घातलेल्या अटीशर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकारने त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याचीच दखल घेत न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्यांना नोटीस बजावत 18 मेपर्यंत कोर्टात हजर राहत अथवा वकिलामार्फत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.