पंकजा मुंडेंना धक्का! वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीस; 25 जानेवारीला होणार ई-लिलाव
Beed News : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास 19 कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. त्यामुळे लोकसहभाग व लोकचळवळीतून 19 कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी केली होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी यासाठी नकार दिला होता. असे असतानाच आता वैद्यनाथ कारखान्याकडे कर्ज थकीत प्रकरण समोर आले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडून ही प्रक्रिया हाती घेतली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार असल्याची माहिती मिळत आहे.
यांच्या नावाने निघाली नोटीस...
लिलावाच्या नोटीसमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, श्रीनिवास दीक्षितुल्लू, ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, गणपतराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी, किसनराव शिंगारे, महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडुरंगराव फड, पंकजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपेट, आर. टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे, व्यंकटराव कराड, यशश्री मुंडे यांच्या नावे नोटीसमध्ये कर्जदार, जामीनदार व तारणदार म्हणून नमूद आहे.
पंकज मुंडे यांना मोठा धक्का...
परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष या पंकजा मुंडे आहेत. हा कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केला होता. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी हा कारखाना उभारला होता. मात्र, मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकेचे कर्ज झाले. त्यापैकी युनियन बँक ऑफ इंडियाचे देखील 203 कोटी 69 लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे या प्रकरणी आता बँकेने नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता यावर पंकजा मुंडे यांची काय प्रतिक्रिया असणार आहे? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय शरद पवार-पंकजा मुंडे यांचा लवाद घेणार