Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय शरद पवार-पंकजा मुंडे यांचा लवाद घेणार
Sugarcane Workers Organisation Meeting : शरद पवार-पंकजा मुंडे हे ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर अंतिम निर्णय घेतील असा साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांच्या मांजरीतील सर्वानुमते निर्णय झाला.
पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय (Sugarcane Workers Demands) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लवाद घेणार आहे. साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांची एक बैठक बुधवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे झाली. ऊसतोड मजुरांच्या दरवाढीत आणि त्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यावर बैठकीत चर्चा झाली. कामगारांच्या मजूरीत 29 टक्के दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे तर ही दरवाढ 40 टक्के असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या. त्यामुळे आज यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही.
पवार- मुंडे घेणार दरवाढीचा निर्णय
ऊसतोड मजुरांच्या दरवाढीबाबत बैठकीत चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजाताई मुंडे यांच्या लवादाने घ्यावा यावर साखर संघ आणि ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं. त्यामुळे येत्या 5 जानेवारीपर्यंत पवार-मुंडे लवादाची बैठक होऊन त्यात ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
निर्णय न झाल्यास पंकजा मुंडे 5 जानेवारीपासून आंदोलन करणार
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पाच उसतोड मजूर संघटना या 5 जानेवारीनंतर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनामध्ये स्वतः पंकजा मुंडे यादेखील सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रातला एकही साखर कारखाना चालू देणार नाही असा इशारा ऊसतोड मजुरांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याच संदर्भात पंकजा मुंडे यांच्यासोबत सर्व संघटनांनी चर्चा केली आहे. त्यानंतर आज ऊसतोड मजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
यापूर्वी 25 डिसेंबरचा साखर संघाला अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची साखर संघाशी चर्चा झाली आणि त्यांनी 5 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागीतीली. त्यामुळे आता साखर संघाला 5 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
'या' आहेत मागण्या...
- ऊस तोडणीसाठी मजुरांना देण्यात येणाऱ्या दरात दुप्पट वाढ करण्यात यावी.
- मुकादमांना 19 टक्के ऐवजी 35 टक्के कमिशन देण्यात यावे.
- त्याचबरोबर ट्रॅक्टर आणि ट्रकमधून होणाऱ्या वाहतुकीच्या दरामध्ये देखील वाढ करण्यात यावी
- ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी प्रत्येक तालुक्यात शाळा आणि वस्तीग्रह उभारण्यात यावेत.
ही बातमी वाचा: