(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaja Munde: आरक्षण तर मिळणारच; पंकजा मुंडेंची मराठा समाजाला साद; बजरंग सोनवणेंवरही साधला निशाणा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांनी आपला पराजय स्वीकारला असून ते हरण्यासाठी निवडणूक लढत असल्याचं पंकजा यांनी म्हटलं.
बीड : राज्यातील तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्या असून चौथ्या टप्प्यातही 11 मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये, राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघातही निवडणूक होत आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे. मात्र, बीड जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना रंगल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे, प्रचारसभेत बोलताना उमेदवारांकडूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत आहे. महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज पाटोदा या ठिकाणी प्रचार सभा घेतली असून या प्रचार सभेत बोलताना आपण देखील कायद्याने मिळणाऱ्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाजूने असल्याचं त्यांनी म्हटलं.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांनी आपला पराजय स्वीकारला असून ते हरण्यासाठी निवडणूक लढत असल्याचं पंकजा यांनी म्हटलं. मी कायद्याने मिळणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बाजूने असून मुंडे साहेबांची देखील हीच भूमिका होती, असं पंकजा मुंडे यांनी सभेत बोलताना सांगितलं. तसेच, मराठा समाजाला आरक्षण कशासाठी हवं? असा प्रश्न देखील सभा सुरू असताना पंकजा यांनी मराठा तरुणांना विचारला. शिक्षणात आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका आमची असून माझ्या विजयामध्ये सर्वांनीच सहभागी व्हावं. आरक्षण तर मिळणारच आहे, आपण सर्व एकच आहोत, असे देखील पंकजा यांनी येथील सभेत बोलताना म्हटले.
दरम्यान, बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात मराठा समाज एकटवल्याचं दिसून येत आहे. तर, जरांगे यांच्या नेतृत्त्वात बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बैठकाही होतात. त्यामुळेच, येथील निवडणुकीला काही प्रमाणात जातीय रंग मिळाला असून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद दिसून येत आहे. मात्र, दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा दाखला देत पंकजा मुंडेंकडून मराठा समाजालाही साद घातली जाते.
बजरंग सोनवणेंनी पराजय स्वीकारला
सभेमध्ये बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी भावनिक होऊन मतदान मागत नाही. तर विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागत आहे, माझ्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे निवडणूक जिंकण्यासाठी लढत नाहीत. त्यांनी आपला पराजय स्वीकारला असून निवडणूक लढण्याची त्यांची मानसिकता नाही. अपप्रचार करुन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही पंकजा यांनी म्हटले.
हेही वाचा
हायव्होल्टेज मतदारसंघात जबरदस्ती पैसे वाटप, आचारसंहिता भंग; आमदार साळवींची आयोगाकडे तक्रार