(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित पवारांना मविआतूनच विरोध; कर्जत-जामखेडमध्ये फडकणार बंडाचे निशाण?
आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत, त्यात कुठला मतदारसंघ कुठल्या पक्षाला हे अजून निश्चित झालेलं नाही.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष येऊ घातलेल्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे. राज्यात मविआ आणि महायुती यांच्यातच थेट सामना आहे. मात्र, पक्ष फुटीनंतर राज्यातील सर्वच मतदारसंघातील राजकिय गणितं बदलली आहेत. त्यातच मविआत सर्वकाही आलबेल असल्याचे वाटत असले तरी अनेक मतदारसंघात मविआमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या कर्जत-जामखेड (Karjat-jamkhed) मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार सध्या आमदार असताना काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विधानसभेची जागा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे, रोहित पवारांच्या (Rohit Pawar) मतदारसंघांतही बंडाणे निशाण फडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत, त्यात कुठला मतदारसंघ कुठल्या पक्षाला हे अजून निश्चित झालेलं नाही. मात्र, कार्यकर्त्यांकडून आपल्याच पक्षाला विधानसभेची जागा मिळावी, आपल्या माणसाला तिकीट मिळावं, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. येथून गतवेळेस त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करुन विधानसभा गाठली होती. मात्र, यंदा महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठका घेत आहेत. त्यामुळे, या दोन्ही पक्षांकडून मतदारसंघावर दावा केला जात असल्याने रोहित पवारांच्या मतदारसंघात ऐनवेळी बंडाचं निशाण फडकू शकतं.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांना डावलं जातंय - शेवाळे
काँग्रेसने केवळ या जागेवर दावाच केला नाही, तर मित्र पक्षांना कायम सहकार्य करत भूमिका बजावली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सातत्याने डावलल जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या कैलाश शेवाळे यांनी केलाय.
विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा - फाळके
विधानसभा निवडणुकीत कुठला मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल हे अजून पक्षश्रेष्ठीकडून ठरायचं आहे. अशात प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाला जागा मिळावी अशी मागणी करण्याचा हक्क आहे. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे, या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा आमदार आहे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला यश मिळालं आहे. त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात जागा आम्हालाच मिळेल, अशी खात्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून व्यक्त केली जात आहे. सोबतच राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असताना देखील जागा मागण चुकीचं असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीत आलबेल असल्याचे चित्र पाहायला मिळत असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र आगामी काळात जागा वाटपावरून संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात रोहित पवारांना भाजपसोबतच महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचाही विरोध पत्करावा लागत आहे.
हेही वाचा
मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार, 3 हजार रुपये खात्यात येणार!