Navneet Rana : नुपूर ने माफी मागितली आणि भाजपनेही कारवाई केली, मग हिंसा कशासाठी?
भाजपने नुपूर शर्मा हिच्यावर तत्काळ कारवाई केली आहे. तिनेही माफी मागितली आहे. मात्र काहींकडून देशाचे वातावरण गडूळ करण्याच्या प्रयत्न करण्यात येत असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
नागपूरः भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा हिने चुक केली. त्यासाठी माफीही मागितली. भाजपनेही तिच्यावर कारवाई केली. तरी काही राजकीय पक्षांकडून लोकांना भडकविण्यात येत आहे. याच्या आडून देशातील वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. अशी प्रतिक्रिया अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी दिली.
शुक्रवारच्या नमाज पठनानंतर देशातील काही भागात हिंसा भडकली होती. तर जागेजागी मुस्लिम बांधवांच्यावतीने निषेध मोर्चेही काढण्यात आले, यावर त्या बोलत होत्या. सामान्य नागरिकांना राजकीय पक्षांच्या राजकारणापासून स्वतःला सतर्क करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी माफी मागितल्यावर देशात हिंसेला वाढविण्यात काय अर्थ आहे. राजकारणात प्रत्येक पक्षाने कधी न कधी चुकीची टिप्पणी केली आहे. मात्र चुकी करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे.
पुढे त्या म्हणाल्या, जे काम करतात त्यांच्याकडूनच चुका होतात, नुपूर शर्माना जाणीव झाली आणि त्यांनी माफी मागीतली. नुपूर शर्माच्या वक्तव्याशी पार्टीचा संबंध नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली, कायद्यानुसार पण त्यांच्यावर कारवाई होईलच. देशात आणि राज्यात जो काही प्रकार काल घडला तो टाळायला हवा, यात नुकसान फक्त सर्व सामान्य जनतेचं होतं.
काही राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना भडकवतात, त्यांना स्वतःचा फायदा घेऊ देऊ नका. राग व्यक्त करायचा आहे, तर तो मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करा, कोणत्या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल झाला? गुन्हे फक्त सर्वसामान्य जनतेवर दाखल होतात, हे सामान्यांनी लक्षात ठेवायला पाहीजे.आपल्या लोकांबद्दल, आपल्या देशाबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे हा देश आपला आहे, असेही त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या