Mahadevrao Mahadik : "शोले'मधला रुपया माझ्याकडे आहे, कसाही उडवा, महाडिकच जिंकणार", अप्पा महाडिक, नाम तो सुना होगा!
Mahadevrao Mahadik : कोल्हापूर जिल्ह्याला अप्पा महाडिक हे नाव माहित नाही असं एकही घर नसेल... जी कॉलर उडवण्याची स्टाईल उदयनराजेंमुळे महाराष्ट्राला परिचीत आहे, ती सर्वात आधी अप्पा महाडिकांची स्टाईल होती.
Mahadevrao Mahadik : माझं नाव महादेव आहे, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा..... "माझ्याकडे 'शोले'मधला रुपाया आहे, कसाही उडवा काटाच पडणार, महाडिकच जिंकणार" ही डायलॉगबाजी आहे कोल्हापूरच्या राजकारणातील कसलेल्या पैलवानाची... वय जवळपास 80 वर्ष, कपाळावर गंध, चेहऱ्यावर चकचकीत तेज, अंगावर सफारी आणि बलदंड शरीर असा हा अनुभवी पैलवान.. जो कोल्हापूरच्या राजकारणातील एकेकाळचा बाहुबली म्हणून ओळखला जाई... तो पैलवान म्हणजे महादेवराव रामचंद्र महाडिक.
कोल्हापूर जिल्ह्याला अप्पा महाडिक हे नाव माहित नाही असं एकही घर नसेल... जी कॉलर उडवण्याची स्टाईल उदयनराजेंमुळे महाराष्ट्राला परिचीत आहे, ती सर्वात आधी अप्पा महाडिकांची स्टाईल होती. गोकुळ दूधसंघापासून ते साखर कारखान्यांपर्यंत, पुलाच्या शिरोलीपासून ते महाडिक पेट्रोल पंपापर्यंत जिल्हाभर पसारा असलेल्या महाडिकांचा दबदबा पुन्हा एकदा दिसू लागला आहे.
18 वर्षे विधानपरिषदेवर आमदार म्हणून राहिलेल्या महादेवराव महाडिकांचा पुतण्या धनंजय आता पुन्हा खासदार झालाय.. राज्यसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांनी भाजपच्या तिकिटावर लढताना शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. धनंजय महाडिक यांना 41 तर संजय पवार यांना 33 मतं मिळाली.
गुलालापासून लांब, सततचा पराभव, अस्तित्त्वाची लढाई अशा परिस्थितीत धनंजय महाडिक राज्यसभेच्या मैदानात होते. धनंजय महाडिकांच्या विजयात देवेंद्र फडणवीसांच्या प्लॅनिंगचा वाटा आहेच. मात्र, अस्तित्त्वाच्या लढाईत महाडिक घराणं ज्या एकखांबी तंबूखाली उभं आहे, त्या महादेवराव महाडिकांच्या खंबीर पाठिंब्याचीही मोठा वाटा आहे.
जे मी पूर्वी पेरलंय ते आता उगवायला सुरुवात झालीय, अशी पहिली प्रतिक्रिया महादेवराव महाडिकांनी दिलीय... महादेवराव महाडिक 18 वर्षे विधानपरिषदेवर होते. त्यामुळे त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात काय काय पेरलंय याचा अंदाज येऊ शकतो.
महादेवराव महाडिकांनी नेमकं काय पेरलंय?
कोल्हापूर जिल्हा आणि महाडिक कुटुंब असं काहीसं समीकरण गेल्या काही काळात होतं. सध्या काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांचा दबदबा असला, तरी कोल्हापुरात एक काळ असा होता, निवडणूक किंवा राजकारणाचं समीकरण म्हणजे महाडिक घराणं....मग ती महापालिकेतील ताराराणी आघाडी असो, गोकुळमधील पॅनल असो, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युती असो वा दूधसंस्था, पतसंस्था असो, महाडिक हे प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोहोचले आहेत.
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या महाडिक कुटुंबाने गत तीन दशकांत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले.
'गोकुळ'वर पकड
ज्याची गोकुळ दूधसंघावर पकड, त्याची जिल्ह्याच्या राजकारणारवर आणि पर्यायाने कोल्हापूरवर पकड हे कोल्हापुरात सर्वश्रुत आहे. 'आमचं ठरलंय आता फक्त गोकुळ उरलंय' या सतेज पाटलांच्या घोषणेवरुन, महाडिकांची गोकुळवर किती पकड होती याचा अंदाज बांधता येईल. सध्या जरी गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ गटाचं वर्चस्व असलं, तरी जवळपास तीन दशकं या दूधसंघावर महाडिकांची मांड होती.
गोकुळचा जवळपास पाच हजार दूधसंस्थांशी थेट कनेक्ट, दररोज 13 लाख लिटर दूधसंकलन आणि वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींच्या घरात. गोकुळच्या संचालकांचा संबंध दूध डेअरीपासून ते दूध उत्पादक शेतकऱ्याच्या चुलीपर्यंत... त्यामुळेच आपसूकच महादेवराव महाडिकांचं नाव केवळ घरातच नाही तर प्रत्येक घरातील चुलीपर्यंत पोहोचलं.. आमदारकी नको पण गोकुळचं संचालकपद हवं असं कोल्हापुरात का म्हणतात हे महाडिकांच्या प्रवासावरुन लक्षात येऊ शकतं.
ताराराणी आघाडी
कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात कोणत्याही राजकीय पक्षांना, महाडिकांची स्थानिक असलेली छत्रपती ताराराणी आघाडी पुरून उरली. महाडिकांच्या ताराराणी आघाडीच्या स्थापनेनंतर कोल्हापूर मनपाच्या सत्तेचा खेळ बदलला. महापालिकेत जवळपास तीन टर्म म्हणजे 15 वर्ष महाडिकांच्या ताराराणी आघाडीचा दबदबा राहिला. एकटी ताराराणी आघाडी सतत सत्तेत राहिली. एक काळ असा होता, कोल्हापुरात म्हण परिचीत होती, महाडिकांनी दगड उभा केला, तरी निवडून येऊ शकतो.
कालांतराने राजकारण बदलत गेलं, सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची ताकद वाढत गेली आणि महाडिकांचा वरचष्मा कमी होत गेला ही सध्यस्थिती आहे.
जिल्हा परिषद
कोल्हापूर महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेवरही महाडिकांचा झेंडा होता. जी परिस्थिती महापालिकेत होती, तशीच काहीशी जिल्हा परिषदेतही होती. आधीच गोकुळ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या महाडिकांनी आधी पंचायत समित्या जिंकल्या. मग जिल्हा परिषदेवरही सत्ता मिळवली.
जिल्हा बँक
कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या सत्ता केंद्रावर महाडिकांची सत्ता राहिली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आता जरी मुश्रीफ गटाचं वर्चस्व असलं, तरी सत्ता गाजवण्याची सुरुवात महाडिकांपासून झाली. मनपा, जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये महाडिकांनी सत्ता मिळवली.
कितीही व्यस्त असो, पहाटे चारचा व्यायाम कधीही चुकणार नाही!
देशाच्या राजकारणातील बडे नेते असलेल्या शरद पवारांच्या वयाइतकंच आप्पा अर्थात महादेवराव महाडिकांचं वय. या वयातही महादेवराव महाडिकांच्या चेहऱ्यावर तेज दिसतंय, त्याचं कारण म्हणजे कधीही न चुकणारा व्यायाम.. बलदंड शरिराचे आप्पा दररोज पहाटे चार वाजतात उठतात, दंड-बैठका काढतात, या वयातही ते सकाळी रनिंग करतात. नाश्त्याला अंडी आणि गुळाचा चहा पितात, असं सांगितलं जातं. या वयातही महादेवराव महाडिकांच्या डोळ्यावर ना चष्मा आहे ना त्यांना कोणती व्याधी.
7474 नंबर
कोल्हापूर जिल्ह्यात तशा स्टाईलवाल्या नंबरप्लेट सर्वांना माहिती आहेत, पण 7474 ही नंबरप्लेट बहुतेकांच्या परिचयाची आहे. हा नंबर महादेवराव महाडिकांचा लकी नंबर आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वच गाड्यांना हा नंबर दिसतो. महादेवराव महाडिकांचा आवडता छंद हा व्यायाम आहे. त्यानंतर मग महाडिकांचं गाड्यांवर प्रेम आहे. त्यांच्याकडे सफारी, जॅग्वार, मर्सिडीज, व्होल्वो अशा गाड्यांचा ताफा आहे. या सर्व गाड्यांचा समान नंबर एकच, तो म्हणजे 7474!
माझं नाव महादेव!
महादेवराव महाडिकांची कहाणी एखाद्या सिनेमातील पात्राला शोभणारी आहे. त्यांचे डायलॉग लक्ष वेधून घेणारे आहेत. त्यामुळेच त्यांनी धनंजय महाडिकांच्या विजयानंतरही आपल्या स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली. "जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही, ज्यावेळी तो (देव) संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल, अन्यथा महाडिकाला कोणी संकटात आणू शकणार नाही. माझं नाव महादेव आहे.. नावच परमेश्वराचं आहे, त्याला कोणी धक्का पोहोचवू शकत नाही" असं महाडिक म्हणतात.
जिल्ह्याच्या रणामध्ये महाडिक कायम असणार आहे, हे महादेवराव महाडिकांनी आज पुन्हा निक्षून सांगितलंय. त्यामुळे नेहमीचं कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा वेगळा निकाल देणारं कोल्हापूर आता कोणतं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
महत्वाच्या बातम्या :