येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करतील का? नितीन गडकरींचे 'माझा कट्टा'वर रोखठोक उत्तर
Nitin Gadkari on Uddhav Thackeray : येत्या निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करतील का? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माझा कट्टावर विचारण्यात आला होता
Nitin Gadkari on Uddhav Thackeray : येत्या निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करतील का? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माझा कट्टावर विचारण्यात आला होता. याबाबत त्यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे. "मी भविष्यवेत्ता नाही. उद्धव ठाकरे आमच्यासोबत येण्याची स्थिती होईल असंही मला सांगायचं नाहीये. मी एकच गोष्ट सांगतो की, काहीही घडू शकतं. राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. तुम्ही हे सांगू शकतं नाही की, हा इथून तिथे का गेला. हे चालतच राहणार आहे. जो आमच्याकडे आला ते पदरी पडलं तो पवित्र झाला", अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी 'माझा कट्टा' वर व्यक्त केली आहे.
आम्ही एकमेकांचे दुष्मन नाहीत
नितीन गडकरी म्हणाले, राजकारणामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात. उद्धव ठाकरेंच्या ऑफरला विनोदाने घ्यावे. आम्ही एकमेकांचे दुष्मन नाहीत. आमचे मतभेद आहेत. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्या पासून सांस्कृतिक राजकीय वारसा आहे. आजवर मनभेद झाले नाहीत. ही महाराष्ट्राची लोकतांत्रिक परंपरा आहे. ही अतिशय चांगली आहे. या परंपरेचा मला अभिमान आणि आदर आहे, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.
माझ्या आणि मोदीजींच्या संबंधांमध्ये कोणताही तणाव नाही
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, अनेकवेळा जाणूनबुजून लोक काही गोष्टी करतात. त्यांची मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही. ते कोठेतरी माझ्या बोलण्याच गैर अर्थ लावतात. काहीजण वेबसाईटवर उलट काहीतरी टाकत असतो. त्यानंतर इतर मीडिया त्याचा आधार घेऊन बातम्या देतात. माझ्या आणि मोदीजींच्या संबंधांमध्ये कोणताही तणाव नाही. माझ नेहमी त्यांच्याशी बोलणं होतं. त्यांच्याशी चर्चा असते. मला दोन कार्यक्रम आयोजित करायचे होते. तेव्हा त्यांनी माझं ऐकलं.
ज्याच्याशी माझी मैत्री आहे, ती मी आयुष्यभर जोपासण्याचा प्रयत्न करतो
माझा स्वभाव आहे, मला दिलेले काम करतो. पक्षाने दिलेले काम व्यवस्थित करणे हेच आपले कर्तव्य आहे. दुसऱ्या राजकीय पक्षातील कोणीही माझ्याकडे दु:ख व्यक्त करण्यासाठी येत नाही. अनेक लोक तर्कवितर्क लावत असतात. माझे वेगवेगळ्या पत्रकारांशी संबंध आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षात माझे मित्र आहेत. ज्याच्याशी माझी मैत्री आहे, ती मी आयुष्यभर जोपासण्याचा प्रयत्न करतो. पण मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे आहे, असंही गडकरी यांनी माझा कट्टावर बोलताना सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या