Nirmala Sitharaman Baramati Visit : पवारांच्या बालेकिल्ल्यावर भाजपची नजर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसीय बारामती दौरा
Nirmala Sitharaman Baramati Visit : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पिंजून काढणार आहेत.
Nirmala Sitharaman Baramati Visit : 2024 मधील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना विविध लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) लवकरच बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा मतदारसंघ आहे. आता सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पिंजून काढणार आहेत.
निर्मला तीन दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. 22, 23 आणि 24 सप्टेंबर 2022 असा त्यांचा दौरा असेल. भाजपने बारामती लोकसभा मतदासंघाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवली आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये निर्मला सीतारमण या खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत. या ठिकाणी विविध एकवीस कार्यक्रम आयोजित केले असून या कार्यक्रमाचा शेवट पुणे इथे पत्रकार परिषदेने होणार आहे.
बारामती मतदारसंघ हा मागील 55 वर्षांपासून शरद पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व करत आहेत.
सीतारमण यांच 18 महिन्यात सहा वेळा दौरा होणार : चंद्रशेखर बावनकुळे
निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, "भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारी अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना बारामती मतदारसंघाच्या प्रभारी बनवलं आहे. सीतारमण पुढील 18 महिन्यात 5 ते 6 वेळा बारामतीमध्ये येतील. आपल्या प्रत्येक दौऱ्यात तीन दिवस बारामतीमध्ये राहून 21 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी सीतारमण या केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेणार आहेत. याशिवाय त्या समाजातील विविध समुदायातील नागरिकांची भेट घेणार आहेत."
आता बारामतीवर ताबा मिळवण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. आम्ही निवडणूक लढवत आहोत. परंतु भाजप बारामतीमध्ये राष्ट्रवादीला कधीही टक्कर देऊ शकलेली नाही. मात्र यावेळी आम्ही जोरदार टक्कर देणार आणि या ठिकाणी पक्षाला अधिक बळकट करुन मतदारसंघावर ताब मिळवण्यासाठी अथक परिश्रम करणार, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हटलं होतं.
भाजपकडून 2024 च्या निवडणुकीची तयारी
भाजप 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोत बैठक घेऊन आढावा घेत आहेत. 2019 च्या ज्या 144 लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता, तसंच उमेदवार दोन किंवा तीन क्रमाकांवर होते, त्या जागांची सध्याची स्थिती आणि तयारीचा आढावा घेतला जात आहे. लोकसभेच्या या 144 जागांमध्ये अशाही जागांचा समावेश आहे ज्यात भाजपचा आधीच्या निवडणुकीत विजय झाला होता, परंतु 2019 मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.