Nilesh Rane Sindhudurg News: 6 नगरसेवकांना निलंबित करताच निलेश राणे आक्रमक; भाजपच्या निर्णयाला केराची टोपली, म्हणाले, सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात!
Nilesh Rane Sindhudurg News: भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या सहा नगरसेवकांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं आहे. यावरून आता आमदार निलेश राणे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

Nilesh Rane Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg News) कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडून आलेल्या आठ पैकी सहा नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत (Prabhakar Sawant) यांनी निलंबित केले आहे. तसं जिल्हाधिकारी यांच्या लेखी पत्राद्वारे याकडे लक्ष वेधत आहे. विशेष म्हणजे कुडाळ नगरपंचायतमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर आठ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी सहा नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमात उठबस अधिक तर भाजपच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे कारण देत निलंबनाची कारवाई पक्षातर्फे करण्यात आली. मात्र यामुळे सिंधुदुर्गात महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतलेल्या निर्णयाला केराची टोपली दिली आहे.
भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या सहा नगरसेवकांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं आहे. यावरून आता आमदार निलेश राणे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय हे खासदार नारायण राणे घेत असतात, म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही. अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी पोस्टद्वारे दिली आहे.
मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 3, 2025
आम्हाला ज्या दिवशी खासदार श्री नारायण राणे साहेब सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू.
सिंधुदुर्गात भाजप चे निर्णय…
नेमकं प्रकरण काय? सहा नगरसेवकांना निलंबित का केलं?
तळकोकणात महायुतीत गेल्या काही दिवसांपासून ठिणगी पडल्याच चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत ठिणगी पडली होती. आता पुन्हा कुडाळ नगर पंचायतमधील भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या सहा नगरसेवकांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं आहे. भाजप पक्षाच्या 'कमळ' निशाणीवर निवडून आलेल्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, संध्या तेरसे, रामचंद्र परब यांचा अधिकृत सिद्धिविनायक नगरविकास आघाडी हा गट स्थापन आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून या गटातील नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी हे सहा नगरसेवक पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत, त्यांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा ते सहकार्य करत नाहीत. भाजपच्या अधिकृत बैठका, सभा आणि कार्यक्रमांना वारंवार अनुपस्थित राहणे, इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर हजर राहणे, पक्षाच्या अधिकृत सदस्यता नोंदणी मोहिमेत सहभागी न होणे आणि सक्रिय सदस्यत्व न घेणे, इतर पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांना हजेरी लावणे, पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात सार्वजनिक विधाने करणे, वरील सर्व बाबी संदर्भात पक्षशिस्त पाळलेली नाही. यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असून, पक्षहित बाधित होत आहे. त्यामुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने, पक्षघटनेतील अधिकारांचा वापर करून पक्षातील सर्व पदांवरून व प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केलं असल्याचं प्रभाकर सावंत यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.























