NCPSP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय? युतीचे अधिकार कुणाला असणार?
NCP SP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त स्वतंत्र मेळावे पार पडले. यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Sharad Pawar Ajit Pawar मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचा वर्धापन दिन स्वतंत्र कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशा चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम पार पडले. महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. प्रभाग रचनांसंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून देखील जोरदार तयारी सुरु आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणाशीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची युती कुणाशीही होऊ शकते, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोडून कुणाशी देखील युतीसाठी तयार आहे, अशी माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामुळं युतीसाठी अजित पवार यांच्या पक्षाचा ही पर्याय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मविआचं काय होणार?
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्यास फारसे इच्छूक नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अद्याप महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा नाही, अशी माहिती देखील आहे.
महाविकास आघाडीतील शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात लढत व्हायची. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवी रणनीती राबवली जाण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या चाचपणीचा प्रयत्न केला जात आहे. त्याशिवाय मुंबईत काँग्रेस देखील स्वबळावर लढू शकते. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची फारशी ताकद मुंबईत नसल्यानं त्यांची युती काँग्रेस सोबत किंवा इतर पक्षांसोबत होऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 जुलै 2022 ला फूट पडली होती. अजित पवार आणि इतर नेते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात दाखल झाले होते. सध्या अजित पवारांचा पक्ष भाजपसोबत युतीत आहे. भाजप देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवण्याचा पर्याय स्वीकारु शकतं. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकत्र येतात का ते लवकरच पाहायला मिळेल.
























