NCP Sharad Pawar Candidates List: मोठी बातमी! सातारा, रावेरचे उमेदवार ठरले, माढ्याचा तिढा मात्र कायम; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
NCP Sharad Pawar Candidates List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसरी यादी जाहीर, सातारा, रावेरचे उमेदवार ठरले, माढ्याचा तिढा मात्र कायम.
Lok Sabha Election 2024 : मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासूनच्या जागावाटपच्या भिजत घोंगड्यावर महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) तोडगा काढला, पण अद्याप अनेक मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षानं आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) साताऱ्यातून (Satara) शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) आणि रावेरमधून (Raver) श्रीराम पाटलांना (Sriram Patil) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे.
महाविकास आघाडीनं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच आज शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. यासंदर्भात ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ट्वीटमध्ये म्हटलंय की, "तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं लोकसभा निवडणूक 2024 ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया!"
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024
माढ्याचा तिढा फक्त बाकी, पवार कोणता पत्ता टाकणार?
शरद पवार गटाकडून आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गटाला 10 जागा सुटल्या आहेत. अशातच 10 पैकी 9 जागांवर पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त माढ्याचा जागेचा तिढा कायम आहे. माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे. अशातच आता पवार आपला कोणता हुकुमी एक्का लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency)
माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांना मिळाली आहे. शरद पवार यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पवारांकडून सर्वात आघाडीवर आहे. मोहिते पाटील उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होणार आहे. मोहिते पाटील याआधी शरद पवार यांच्यासोबतच होते, त्यामुळे घरवापसी झाल्यास त्यांना उमेदवारी मिळू शकते.
मोहिते पाटील यांच्याशिवाय अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप यांची नावेही चर्चेत आहेत. अनिकेत देशमुख यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. माढ्यात शरद पवार काय निर्णय घेतात, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Lok Sabha Constituency)
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला, त्यामुळे शरद पवार यांच्याकडून साताऱ्यात उमेदराची चाचपणी करण्यात आली. अखेर साताऱ्यासाठी शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपकडून साताऱ्यात अद्याप उमेदवाराची घोषणा कऱण्यात आलेली नाही, पण उदयनराजे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ (Raver Lok Sabha Constituency)
एकनाथ खडसे यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्याकडून खडसेंना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. पण खडसेंनी नकार दिला. त्यामुळे शरद पवारांकडून इच्छूक उमेदवारांची चाचपणी कऱण्यात येत आहे. रवींद्र पाटील आणि श्रीराम पाटील यांची नावं आघाडीवर होती. अखेर आज श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. रावेरमधून भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रावेर मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना होणार आहे.