(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Political Crisis: काका की पुतण्या? अजितदादांनी मुंबईत बोलावलं तर पवार-सुप्रिया यांचे फोन, घरच्या गोंधळात राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात
काका-पुतण्यांनी एकत्र राहावं अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. पुढील तीन-चार दिवसांत नेमकं काय घडतं, हे पाहून आणि माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून मी माध्यमांशी बोलेल असे बेनके म्हणाले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री-पदाची शपथ घेतली. यावरून राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहे. काकांकडे जावे की पुतण्याकडे जावे असा संभ्रम त्यांच्यापुढे आहे. ऐनवेळी शपथविधीची माहिती मिळाल्यामुळे समर्थनाच्या पत्रावर सही केल्याची माहिती आमदारांनी दिली आहे. मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून नेमकं कोणाच्या बाजूनं आपण उभं राहायचं हे ठरवणार असल्याचे कार्यकर्ते म्हणाले.
अजित पवारांसह नऊ मंत्र्यांच्या शपथविधीचे साक्षीदार असणारे जुन्नरचे आमदार अतुल बेनके संभ्रमात पडलेत. बेनके यांना अजित पवारांनी फोन करून मुंबईत बोलावून घेतलं, आधीपासून त्यांना असं काही घडेल याची कुणकुण होतीच. पण काल मात्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी बैठक बोलावली असेल, असा त्यांचा ग्रह होता. मात्र थेट शपथविधी पार पडला. त्यानंतर काही वेळातच थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे बेनके यांना फोन आल्यानं त्यांची गोची झाली आहे. त्यामुळं शरद पवार की अजित पवार अशी स्पष्ट भूमिका घेणं त्यांनी तूर्तास टाळलं आहे. मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून नेमकं कोणाच्या बाजूनं आपण उभं राहायचं, हे आम्ही ठरवू,असा पवित्रा शपथविधी सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या बेनके यांनी घेतलाय. काका-पुतण्यांनी एकत्र राहावं अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. पुढील तीन-चार दिवसांत नेमकं काय घडतं, हे पाहून आणि माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून मी माध्यमांशी बोलेल असे बेनके म्हणाले.
काका की पुतण्या?
अतुल बेनके यांचे वडील माजी आमदार वल्लभ बेनके हे शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. तर अतुल बेनके हे शरद पवार आणि अजित पवार या दोघांशी जुळवून घेत आलेत. त्यामुळेचं सद्यपरिस्थितीत बेनके यांच्या समोर नेमकं कोणाच्या बाजूनं उभं राहायचं हा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या दिला आहे.मात्र मतदारसंघातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे संदेश येत आहेत. त्यामुळे काका की पुतण्या हा संभ्रम कायम असल्याचे दिसून आले.
अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीला काल शपथ घेतलेले मंत्री आणि ज्यांनी सह्या केल्या नाहीत त्याच आमदारांना आणि खासदारांना बोलावण्यात आलं आहे. आतापर्यंत देवगिरी या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,संजय बनसोडे, छगन भुजबळ, राम राजे निंबाळकर, सुनील तटकरे हे उपस्थित आहेत. या बैठकीत मागील बंडाप्रमाणे हे फसू नये म्हणून या आमदारांना विश्वासात घेतलं जाणार आहे. या बैठकीत आपली पुढची भूमिका काय याविषयी अजित पवार मार्गदर्शन करतील