Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची विधानसभा सिन्नरमधून लढवण्याची ऑफर, अजित पवार म्हणाले, बारामती माझी आहे...
Manikrao Kokate : सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना दादा विधानसभेसाठी सिन्नरमध्ये या, इथून दीड लाख मतांनी निवडून देऊ असं म्हटलं आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आज सिन्नरमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं गेले आहेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या निमित्त मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना सिन्नरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. यावर अजित पवार यांनी बारामती माझी असून घरट्यात गेलेलं बरं असं म्हटलं.
माणिकराव कोकाटेंची अजित पवारांना ऑफर
माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघासाठी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. 30 फूट जमिनी खालून पाईपलाईन करून चर खोदून पाणी सिन्नर च्या पश्चिम भागातून पूर्व भागात वळविण्यात आले आहे.राज्यात अशी योजना नाही.त्यामुळे नदीजोड प्रकल्पाला मान्यता मिळावी. राघोजी भांगरे यांच्यां स्मरकचे काम मार्गी लावावे. येत्या कॅबिनेट बैठकीत त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली. दोन्ही मिळून साडेचौदा हजार कोटींची कामे आहेत. या आधी एवढ्या मोठे काम तालुक्यात झाले नव्हते, असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.
सिन्नर तालुक्याच्या विकासासाठी मी पक्ष बदलले, सरकार मध्ये गेलो. मतदारसंघाच्या विकासासाठी अजित पवार यांच्या सोबत गेलो. तीन साडेतीन हजार कोटींची कामे केली आहेत.अजून चौदा पंधरा हजार कोटींचं काम करायचं आहे.एवढा निधी कोण देणार आहे, यासाठी मी अजित पवार यांच्या सोबत गेलो, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांनी त्यांचं भाषण संपवताना अजित पवारांनी सिन्नर मधून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. मला बारामती सारखा सिन्नर करायचं आहे.बारामतीचा माणूस इथं पाहिजे, मला दादांनी खूप दिले आता अजित पवारांनी सिन्नर मधून निवडणूक लढवावी. दादांना सिन्नरमधून दीड लाखांचं मतांनी निवडून देतो. एकही मत कमी झालं तर मुंबईत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
आपल्या घरट्यात गेलेलं बर : अजित पवार
अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचं कौतुक केलं. आमदारांच्या हातात धमक आणि ताकद असावी लागते तसाच आमदार तुम्हाला लाभला आहे. माणिकराव कोकाटे यांनी मला इथून उभे राहा म्हटले पण परवा बारामतीकरांनी माझी गाडी अडवली होती. बारामती माझी आहे, त्यामुळे मी आपल्या घरट्यात गेलेलं बरं, असं अजित पवार म्हणाले. आपण स्पर्धा लावू बारामतीचा आमदार जास्त मतांनी निवडून येतो की सिन्नरचा असं अजित पवार म्हणाले. यावेळी बारामती मधून निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले.
इतर बातम्या :