Ashok Chavan: कालपर्यंत लोकं तुमच्यावर फुलं उधळायचे, आज तुम्हाला RSSच्या पथसंचलानवर फुलं उधळावी लागतायत; प्रताप चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका
Pratap Patil On Ashok Chavan: लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मंगळवारी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली.

Pratap Patil On Ashok Chavan: वडिलांपासून काँग्रेस पक्षाचा पिढीजात वारसा असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधक विचारसरणीच्या मुद्द्यावर चव्हाण यांना कायम लक्ष्य करत असतात. लोहा कंधार मतदारसंघाचे अजितदादा गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी मंगळवारी याच मुद्द्यावरुन अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. गेली 50 वर्षे नांदेडमधील (Nanded News) जनता तुमच्यावर फुलं उधळत होती. मात्र, आता तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनावर फुलं उधळावी लागत आहेत, अशी टीका प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. राष्ट्रवादी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी नांदेडमधील पूरग्रस्त भागात रेशनच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रताप पाटली चिखलीकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी प्रताप चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना बोचरी टीका करत डिवचले. त्यांनी म्हटले की, अशोक चव्हाण यांची हालत काय झाली पाहा. तुम्ही ज्यांच्या जिवावर 50 वर्षे राज्य केले, जे लोक पहिले तुमच्याकडे येत होते, ते आज कुठे आहेत ते पाहा. येथील जनतेने 50 वर्षे तुमच्यावर फुलं उधळली. आता तुम्हाला आरएसएसच्या पथसंचलनावर फुलं उधळावी लागत आहेत. आमच्या स्वागतासाठी लोक फुलं घेऊन उभी राहत आहेत. तुमची हालत काय झाली आहे, ते पाहा. यापुढे अशोक चव्हाण तुमच्याकडे मत मागायला येऊ शकत नाहीत. इथून पुढे तुमची सगळी मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्या. तुमची सगळी जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.
विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध शाखांमध्ये शस्त्रपूजन सोहळा आणि पथसंचलन केले जाते. यंदा नांदेडमध्येही RSS कडून शिवाजीनगर परिसरात पथसंचलन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी संघ स्वयंसेवकांवर फुलांची उधळण केली होती. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषविले होते. स्वत: अशोक चव्हाण हेदेखील काँग्रेस पक्षात असताना मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण हे गांधी घराणे आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यापासून अशोक चव्हाण यांच्यावर सातत्याने टीका होताना दिसते.
आणखी वाचा
मला संपवण्याची भाषा केली, अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यावचं लागतं, अशोक चव्हाण कडाडले

























